कुंभमेळा तर ‘फरवरीत’ आहे ना ?
By admin | Published: January 22, 2015 01:01 AM2015-01-22T01:01:41+5:302015-01-22T01:02:06+5:30
राज्यमंत्र्यांचे असेही ज्ञान : तुम्हीच सांगा किती वर्षांनी येतो कुंभमेळा? आमचे सरकार पॉझिटिव्ह आहे..
.नाशिक : ‘पुढच्या महिन्यात म्हणजेच ‘फरवरीत’ कुंभमेळा आहे ना? मग गोदावरी स्वच्छ होऊन जाईल. आमची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असून, लवकरच तुम्हाला रिझल्ट दिसेल. (मध्येच मंत्रिमहोदयाच्या कानात आॅगस्टमध्ये कुंभमेळा असल्याचे सांगितले जाते.) ओके ओके...! मला सांगा तुम्ही सर्वजण नाशिकचे आहात ना ! मग हा कितवा कुंभमेळा आहे? (मध्येच साहेब दर बारा वर्षांनी कुंभमेळा येत असतो) हो काय? मग चिंतेचे कारण नाही. सर्व समस्यांचे निराकरण होईल. हे बघा आमचे सरकार पॉझिटिव्ह आहे, आम्हाला लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत, त्यामुळे तुमच्या मनात असलेल्या प्रत्येक प्रश्नांचे आम्ही उत्तर देऊ. फक्त जादूच्या कांडी फिरविल्यासारखी अपेक्षा धरू नका...एका दमात सर्वच ज्ञान प्रकट करणाऱ्या उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांंची वाणी ऐकली आणि मंत्रिमहोदयांच्या या सामान्यज्ञानावर (?) काय बोलावे हे कोणासही सुचेना!
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मंत्र्यांंचे दौऱ्यावर दौरे सुरू आहेत. पालकमंत्री, सहकार राज्यमंत्री, उद्योगमंत्री यांच्या पाठोपाठ उद्योग राज्यमंत्री यांनी नाशिकमध्ये दौरा आयोजित केला होता. अर्थातच त्याचे निमित्त होते ते नाशिकमधील उद्योगांना भेटी आणि मुख्यत्वे करून ज्या गंगा गोदावरीत कुंभमेळा होणार आहे त्या गोदावरीचे प्रदूषण थांबविणे! दुपारी साडे तीन वाजता नाशिकमध्ये पोहचून त्यांची सातपूर- अंबडच्या औद्योगिक क्षेत्रात भ्रमंती होणार होती. तथापि, त्यांचे नाशिकमध्ये आगमनच मुळी पावणेसात वाजता झाले. अशा ‘उत्तर सायंकाळी’ कसली पाहणी आणि कसली गोदापात्रात न्हाणी? स्वत:च विलंबाने आलेल्या मंत्रिमहोदयांना त्यांच्या व्यस्ततेमुळे पाणी देण्यास विलंब झाल्याने त्याचा राग संबंध नाशिककरांवरच काढत त्यांनी नाशिकमध्ये पाणी उशिरा दिले जात काय असा प्रश्न केला.
शासकीय विश्रामगृहावर पोहचल्यानंतर त्यांनी पक्षाच्या पदाधिकारी असलेल्या औद्योगिक संघटनांचे निवेदन स्वीकारले आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाविषयी चर्चा करणाऱ्यांना त्यांनी आपल्याच खात्यात येत असलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळात प्रचंड भ्रष्टाचार असल्याचे सांगून आता आपण या भ्रष्टाचाराचा नायनाट करू अशी ग्वाही स्वत:हूनच दिली. इतकेच नव्हे तर नंतर आपल्या कडव्या (?) शिस्तीचा परिचय देण्यासाठी प्रदूषण मंडळात अधिकारी-कर्मचारी किती असे थेट कोडे स्थानिक अधिकाऱ्यांना टाकले. महोदयांचा दरारा बघून भांबावलेल्या अधिकाऱ्यांनी एकमेकांत चर्चा सुरू केली आणि ३२ चा आकडा सांगितला खरा; परंतु त्यामुळे महोदय जाम संतापले. अधिकाऱ्यांंचे ज्ञान किती सामान्य आहे, अशा आशयाने हजेरी घेतली. नंतर पत्रकारांच्या प्रश्नाच्या उत्तराला त्यांनी आपलेच ज्ञान प्रकट केले. कुंभमेळा फरवरीत आहे ना या त्यांच्या खास विदर्भाच्या शैलीमुळे उपस्थित अधिकारी थक्क झाले. पुढे आपले ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी बहुधा त्यांनी नाशिककर तुम्हीच सांगा कधी कुंभभेळा भरतो ते.. दहा वर्षांनीच ना... असे सांगितल्याने सारेच अंचबित झाले. काही काळजी करू नका, कुंभमेळ्यापर्यंत गोदावरी साफ होईल, अशी घोषणाही त्यांनी करून टाकली. (प्रतिनिधी)