कुंभमेळा सामाजिक समरसतेचे ठिकाण
By Admin | Published: September 7, 2015 10:08 PM2015-09-07T22:08:10+5:302015-09-07T22:09:47+5:30
कुंभमेळा सामाजिक समरसतेचे ठिकाण
त्र्यंबकेश्वर : कुंभमेळा काळात गंगेच्या पाण्यात एक अलौकिक शक्ती आणि ऊर्जा आलेली असते. गंगामातेच्या पात्रात स्नान करणाऱ्यांमध्ये कोणताही भेदाभेद केला जात नाही. त्यामुळेच सामाजिक समरसता निर्माण करण्याचे उत्तम ठिकाण म्हणजे कुंभमेळा असल्याचे स्वामी अवधेशानंद महाराज यांनी सांगितले.
सिंहस्थ कुंभमेळ्याचे महत्त्व आणि हिंदूंची हजारो वर्षांची श्रद्धा याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, कुंभमेळ्यात पाणी हा महत्त्वाचा घटक असतो. दर कुंभमेळ्यात त्या त्या ठिकाणच्या गंगेच्या पाण्यात रासायनिक बदल होत असतात. त्या रासायनिक बदल झालेल्या पाण्याचा मनुष्याच्या जीवनावर सकारात्मक व प्रभावशाली परिणाम होत असतो. त्यामुळे अंत:करणात पवित्रता निर्माण होते. तसेच आत्म ऊर्जा आणि सकारात्मक विचार यांची वाढ होते. गंगामाई साऱ्यांना आपल्यात सामावून घेते. त्यांची दु:खे आपल्या पोटात घेऊन आनंदाची, समाधानाची भावना त्यांना प्रदान करते. त्यामुळे कुंभमेळा पर्वात स्नानाला सर्वाधिक महत्त्व आहे.
त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यात सुरू असलेल्या विविध धार्मिक कार्यांमधून जी ईश्वराची आराधना सुरू आहे त्याने या नगरीतही एक अलौकिक ऊर्जा निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.