नाशिकला सह्याद्रीच्या डोंगरयात्रींचा भरणार 'कुंभमेळा'; गिर्यारोहकांचे पहिलेच संमलेन
By अझहर शेख | Published: July 4, 2023 05:28 PM2023-07-04T17:28:34+5:302023-07-04T17:28:55+5:30
नाशिकमधील प्रख्यात गिरीभ्रमणकार स्व.अविनाश जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय ‘सह्याद्री मित्र संमेलन’ हे भरविण्यात आले आहे.
नाशिक - सह्याद्री पर्वतरांगेत गिरीभ्रमंती करणाऱ्या डोंगरयात्रींचा पहिला मेळा येत्या शुक्रवारी (दि.७) महाकवी कालिदास कलामंदिरात पार पडणार आहे. या संमेलनात गिर्यारोहण क्षेत्रात योगदान देणाऱ्या विविवध व्यक्ती व संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. गिर्यारोहकांचे अशाप्रकारचे संमलेन राज्यात पहिल्यांदाच होत आहे.
नाशिकमधील प्रख्यात गिरीभ्रमणकार स्व.अविनाश जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय ‘सह्याद्री मित्र संमेलन’ हे भरविण्यात आले आहे. नाशिकमधील सर्व गिर्यारोहक मंडळी, संस्थांची एक संमेलन आयोजन समिती यासाठी प्रयत्नशील आहे. शुक्रवारी दुपारी ४वाजता संमेलनाला प्रारंभ होणार असून सेवानिवृत्त कृषी अधिकारी असलेले धुळ्याचे रंगराव अण्णा पाटील हे एक ज्येष्ठ अनुभवी गिर्यारोहक संमेलनाचे अध्यक्षपद भुषविणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.
या संमेलनात भारतातील नामवंत गिर्यारोहक, लेखक ‘ट्रेक द सह्याद्री’ हे पुस्तक लिहिणारे हरिषजी कापडिया यांना ‘सह्याद्री रत्न’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच पुणे येथून प्रसिद्ध गिर्यारोहक आनंद पाळदे हेदेखील या संमेलनाला हजेरी लावणार आहे.
असे आहेत पुरस्कारार्थी...
हरिष कापडीया- सह्याद्री रत्न
नितीन मोरे (पुणे) - ट्रेकर्स ऑफ द इयर
कमळू पोकळा (मुरबाड) - द बेस्ट ‘वाटाड्या’
बा रायगड - दुर्गसंवर्धन टीम ऑफ द इयर
शिवदुर्ग मित्र (लोणावळा) - रेस्क्यू टीम ऑफ द इयर.
संग्राम गोवर्धने (नाशिक) - लॅण्डस्केप डीएसएलआर फोटोग्राफी
पृथ्वीराज शिंदे- लॅण्डस्केप मोबाइल फोटोग्राफी
नाशिक क्लाईम्बर्स रेस्क्युअर- विशेष पुरस्कार
नाशिकच्या युवकांच्या साहसी थरार...
नाशिकमधील युवकांची हरिश्चंद्र गड कोकणकडा क्लाईबिंकची एक साहसी थराराचा लघुपट या संमेलनात दाखविण्यात येणार आहे. यानिमित्त नाशिककरांच्या साहस अनुभवण्याची संधी मिळणार आहे. सह्याद्री संमेलन भरविणारे नाशिक हे राज्यातील दुसरे शहर ठरले आहे.