कुंभ पर्वण्या संपल्या, वाहतूक बेटे दुर्लक्षली

By admin | Published: November 21, 2015 11:59 PM2015-11-21T23:59:53+5:302015-11-22T00:01:53+5:30

देखभाल यथातथाच : अनेक बेटे सुशोभिकरणाविना, तर काही बेटांची दुरवस्था

Kumbh Mountains ended, traffic islands neglected | कुंभ पर्वण्या संपल्या, वाहतूक बेटे दुर्लक्षली

कुंभ पर्वण्या संपल्या, वाहतूक बेटे दुर्लक्षली

Next

नाशिक : कुंभमेळ्याच्या काळात महापालिकेने खासगी विकासकांमार्फत सुशोभित करवून घेतलेल्या वाहतूक बेटांपैकी बोटावर मोजण्याइतके अपवाद वगळल्यास अन्य बेटांच्या सुशोभिकरणाला कुंभमेळ्याच्या पर्वण्या संपल्यानंतरही मुहूर्त लागू शकलेला नाही. एवढेच नव्हे, तर सुशोभित केलेल्या बेटांची देखभालही यथातथाच होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीचे वेध लागलेल्या शहरातील वाहतूक बेटे ‘स्मार्ट’ कधी होतील, याची प्रतीक्षा लागून आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यात शहरात लाखो भाविक दाखल होणार असल्याने महापालिकेने शहरातील प्रमुख चाळीस वाहतूक बेटांच्या ‘नवनिर्माणा’ची जबाबदारी खासगी विकासकांवर सुपूर्द केली होती; मात्र त्यांपैकी अवघ्या पाच ते सात वाहतूक बेटांचेच रूपडे पालटल्याचे चित्र आहे. अन्य वाहतूक बेटांचे दुरवस्थेचे ग्रहण अद्यापही सुटलेले नाही. मुंबई नाका, अशोकस्तंभ, गडकरी चौक यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणची वाहतूक बेटे अद्यापही विकसित व सुशोभित होऊ शकलेली नाही.
दरम्यान, शहरातील अनेक वाहतूक बेटांची पाहणी केली असता, काही महिन्यांपूर्वीच सुशोभित केलेल्या या बेटांनादेखील देखभालीअभावी पुन्हा मूळ स्वरूप प्राप्त होत असल्याचे चित्र आहे. त्र्यंबक रोडवरील एबीबी सर्कल येथे चक्क वाहतूक बेटामध्येच पोलिसांनी बॅरिकेड्स ठेवले आहेत. त्यामुळे या वर्तुळातील योगशिल्पाच्या सौंदर्यालाच बाधा निर्माण झाला आहे. या बेटाचे वर्तुळाकार लोखंडाचे पाइपही चोरट्यांनी कापून नेले आहेत.
कुंभकाळातच रविवार कारंजा येथे अमृतकुंभ घेऊन भरारी घेणाऱ्या गरुडाचे शिल्प असलेले वाहतूक बेट साकारण्यात आले आहे; मात्र शिल्पाच्या उभारणीप्रसंगी वापरण्यात आलेले पाणी बेटातच साचलेले असून, ते गढूळ झाले आहे. तसेच या बेटाच्या आजूबाजूला रिक्षा, चारचाकी वाहनांचे कोंडाळे नेहमी उभे राहत असल्याचे चित्र आहे. निमाणी येथील शेतकरी व मजुरांचे शिल्प असलेले वाहतूक बेट धुळीने माखले असून, या बेटाच्या समोरच्या बाजूने अनधिकृत होर्डिंग लावण्यात आले आहे. एवढेच नव्हे, या शिल्पाची पडझड झाली असून, शिल्पातील शेतकऱ्याच्या खांद्यावर असलेला नांगरही तुटून पडला आहे.
अशोकस्तंभ येथील वाहतूक बेटाची अवस्था तर पाहवणार नाही एवढी बिकट झाली आहे. या बेटाचे कठडे तुटले असून, बेटात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. याशिवाय आजूबाजूचे गॅरेजचालक या बेटात खराब टायर्स आणून टाकत असल्याने त्याच्या दुरवस्थेत दिवसेंदिवस भरच पडत आहे. होर्डिंग लावण्यासाठीही या बेटाचा वापर केला जात आहे. त्र्यंबक रोड येथील वाहतूक बेटात पुस्तकांचे शिल्प उभारण्यात आले खरे; मात्र त्या शिल्पालाच पताका लावण्यात आल्या असल्याने ते विद्रूप झाले आहे. तर गडकरी चौकातील वाहतूक बेटामध्ये लावण्यात आलेली बोगनवेल अस्ताव्यस्त वाढल्याने बेटाचे सौंदर्य वाढण्याऐवजी ते अधिकच विद्रूप दिसत आहे. या वेलींमुळे बेटामधील शिल्पही झाकले गेले आहे. दरम्यान, रेडक्रॉस सिग्नल येथील कोपऱ्यावरील वाहतूक बेट मात्र नुकतेच सुशोभित करण्यात आले असून, ते अद्याप सुस्थितीत आहे. याशिवाय कृषिनगर येथील वाहतूक बेट अर्थात ‘सायकल सर्कल’ही नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Web Title: Kumbh Mountains ended, traffic islands neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.