कुंभनगरीचे पर्यटन ‘रामभरोसे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 11:42 PM2017-09-26T23:42:47+5:302017-09-27T00:33:55+5:30

शहरातील रामकुंडापासून तर तपोवनापर्यंत सर्वच पर्यटनस्थळे वाºयावर असल्याचे दिसून येत आहे. या पर्यटनस्थळांना भेटी देऊन पाहणी केली असता शहरातील यंत्रणांना पर्यटनस्थळे, पर्यटकांचे समाधान, प्राचीन मंदिरे त्यांचा इतिहास, सोयीसुविधा अशा कुठल्याही बाबींचे सोयरसुतक नसल्याचे दिसते. नाशिक शहर हे देशभरात नव्हे तर जगभरात धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. दक्षिणवाहिनी गोदावरीच्या काठावरील एकापेक्षा एक लहान-मोठी मंदिरे व त्यांचे माहात्म्य हे भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे.

Kumbhnagiri Tourism 'Ram Bharose' | कुंभनगरीचे पर्यटन ‘रामभरोसे’

कुंभनगरीचे पर्यटन ‘रामभरोसे’

googlenewsNext

जागतिक पर्यटन दिन
अझहर शेख।
नाशिक : शहरातील रामकुंडापासून तर तपोवनापर्यंत सर्वच पर्यटनस्थळे वाºयावर असल्याचे दिसून येत आहे. या पर्यटनस्थळांना भेटी देऊन पाहणी केली असता शहरातील यंत्रणांना पर्यटनस्थळे, पर्यटकांचे समाधान, प्राचीन मंदिरे त्यांचा इतिहास, सोयीसुविधा अशा कुठल्याही बाबींचे सोयरसुतक नसल्याचे दिसते. नाशिक शहर हे देशभरात नव्हे तर जगभरात धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. दक्षिणवाहिनी गोदावरीच्या काठावरील एकापेक्षा एक लहान-मोठी मंदिरे व त्यांचे माहात्म्य हे भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे.  वनवासकाळात प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य, रावणाने सीतेचे केलेले हरण आणि लक्ष्मणाने शूर्पणखेचे कापलेले नाक, कपिला ऋषी यांची तपश्चर्या आदी पौराणिक घटनांचा साक्षीदार असलेला तपोवन-पंचवटी परिसर हे शहराचे मुख्य धार्मिक पर्यटनाचे केंद्र आहे. या केंद्राकडेच महापालिका, महाराष्टÑ राज्य पर्यटन विकास महामंडळ या संस्थांच्या प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. रिक्षाचालक गाइडच्या भूमिका बजावताना दिसून येतात. रामकुंडापासून तर तपोवनापर्यंत विविध मंदिरे, गोदावरीचे माहात्म्य, पौराणिक इतिहास, आख्यायिका अशा सर्वच बाबींवर येथील रिक्षाचालक मंडळी आलेल्या भाविकांपुढे प्रकाश टाकतात. यावेळी त्यांना प्रमुख अडचण भेडसावते ती भाषेची. शहरात येणारा पर्यटकवर्ग हा दक्षिण भारतीय राज्यांमधील अधिक आहे. याबरोबरच गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमधूनही पर्यटक मोठ्या संख्येने धार्मिक पर्यटनासाठी येतात.
पंचवटी भागातील गोदाकाठावरील रामकुंडापासून अन्य प्राचीन १७ कुंडांची माहिती, गंगा-गोदावरी प्राचीन मंदिर व त्यांची महती, इतिहास, गोदावरीला लाभलेला पौराणिक वारसा अशी कुठलीही माहिती मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू, कन्नड, मल्याळम्, तामीळ आदी भाषांमध्ये दर्शनी भागात उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना याकडे महाराष्टÑ राज्य पर्यटन विभागासह महापालिका व जिल्हा प्रशासनानेही दुर्लक्ष केले आहे.
भारत देशामध्ये सर्वाधिक पर्यटन हे धार्मिक स्वरूपात होते. धार्मिक, पौराणिक वारसा असलेली शहरे देशात बहुसंख्य असून, त्यापैकी एक म्हणजे एकेकाळी ‘गुलशनाबाद’ अशी ओळख मिरविणारी कुंभनगरी नाशिक. धार्मिक पर्यटनासाठी देशाच्या कानाकोपºयातून भाविक आजही नाशिकमध्ये श्रद्धेने येतात; मात्र या कुंभनगरीचे पर्यटन प्रशासकीय अनास्थेमुळे ‘रामभरोसे’ असल्याचे विदारक चित्र आहे. शेकडो मैलांचा प्रवास करून आलेले पर्यटक शहराच्या इतिहासाची अर्धवट आणि काहीशी चुकीची माहिती घेऊन परततात.
महाराष्टÑ पर्यटन विभागाचे ‘दर्शन’च नाही !
‘महाराष्टÑ अनलिमिटेड’ हे ब्रीद घेऊन मिरविणाºया राज्याचे पर्यटन विकास महामंडळाचे ‘दर्शन’ रामकुंड ते तपोवनापर्यंत कु ठेही घडत नाही. पर्यटन विकास महामंडळाने या भागाकडे जणू दुर्लक्षच केले आहे, की काय अशी शंका आल्यास नवल वाटू नये. धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले पर्यटनस्थळ नाशिक हे पर्यटन विभागालाच ज्ञात नसावे, असा प्रश्न येथे आलेल्या पर्यटकांच्या मनात येत असावा. कारण कुठेही कोणताही फलक किंवा एखाद्या मंदिराविषयीची किंवा त्या परिसरातील पौराणिक माहिती व माहात्म्यावर प्रकाश टाकणारा फलक नजरेस पडत नाही. एवढेच नव्हे तर शहरात आलेल्या पर्यटकाला राज्य पर्यटन महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय शहरात आहे, हेदेखील सांगणारे फलक या भागात नाही. त्यामुळे पर्यटन विभाग नाशिकच्या धार्मिक पर्यटनापासून ‘अनभिज्ञ’ आहे की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.रामदास व्यवहारे, सुभाष कर्डिले (निफाड), धनंजय गांगुर्डे (पिंपळगाव), करण चौधरी (ओझर), विलास गोरे, दत्तात्रय शिरसाठ, सोमनाथ शिरसाठ, बाळासाहेब नेवगे.
रिक्षाचालकांवरच ‘नाशिक दर्शन’ची दारोमदार
‘नाशिक दर्शन’ घडविणारे, रामकुंड-तपोवन दर्शन घडविणारे गंगाघाटावरील रिक्षाचालक तसेच सीतागुंफा स्थानकावरील तपोवन दर्शन घडविणाºया रिक्षाचालकांवरच या परिसरातील धार्मिक पर्यटनाची दारोमदार असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. या भागात फेरफटका मारल्यानंतर नाशिकच्या पर्यटनाचे वैशिष्ट्य कानाकोपºयातून आलेल्या पर्यटकांपर्यंत पोहचावे, असे कुठल्याही शासकीय यंत्रणेला वाटत नसावे, याचा प्रत्यय सहज येऊन जातो. ‘पंचवटी’, ‘तपोवन’ दर्शन हेच उदरनिर्वाहाचे साधन असल्यामुळे रिक्षाचालक तळमळीने घशाला कोरड पडेपर्यंत ‘नाशिक’ समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. यावेळी त्यांना अनेक मर्यादाही येतात. शिक्षणाचा अभाव असूनही रिक्षाचालक नाशिकचे पौराणिक-धार्मिक महत्त्व, इतिहास हे हिंदी भाषेतून समजावण्याचा प्रयत्न करतात.
महामंडळाच्या पर्यटन माहितीपुस्तिका कार्यालयातच
‘नाशिक दर्शन’, ‘नाशिकच्या चौफेर सौंदर्याचा मनसोक्त आनंद घ्या’ अशा दोन माहिती पुस्तिका महराष्टÑ राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने छापण्यात आल्या आहेत. या पुस्तिका पर्यटकांपर्यंत पोहचण्यास मात्र अद्याप मुहूर्त लाभत नाही किंबहुना पर्यटकांच्या हातात त्या पडाव्या, त्याची कुठलीही तजवीज महामंडळाच्या वतीने करण्यात आलेली नाही. ‘नाशिकचे सौंदर्य...’ ही पुस्तिका सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये छापण्यात आली. पर्वणीदरम्यान, स्टॉल्सवरून जेवढ्या पुस्तिका पर्यटकांपर्यंत पोहचल्या तेवढ्याच. त्यानंतर या पुुस्तिका कार्यालयाच्या टेबलावर शोभेसाठी उपलब्ध आहेत. एकूणच ‘नाशिकचे’ ब्रॅन्डिंग करण्यात पर्यटन महामंडळाला अपयश येत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास करणाºया पर्यटन महामंडळाने शहरातील मुख्य धार्मिक केंद्र असलेल्या पंचवटी-तपोवन या भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पाऊल उचलावे, एवढीच माफक अपेक्षा या भागात धार्मिक पर्यटनासाठी येणारे भाविक व्यक्त करत आहे.
‘तपोवन’ शोधावे कुठे?
तपोवन या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. तप करण्यासाठी निवडलेले दंडकारण्य. हे तपोवन पंचवटीच्या पूर्वेला असून गोदावरी-कपिला नद्यांच्या संगमावर वसलेले हे तीर्थक्षेत्र आहे. तपोवनात धार्मिक असलेली आठ ठिकाणे अष्टतीर्थ म्हणून ओळखली जातात. दुर्दैवाने याची कुठलीही माहिती या भागात वाचण्यासाठी कुठल्याही भाषेत पर्यटकांना अद्याप उपलब्ध झालेली नाही. ऋषी-मुनींनी अनुष्ठान, जप, ध्यानधारणा, यज्ञ यांसारखी तपश्चर्या केल्याची आख्यायिका सांगितली जाते. काळानुरूप दंडकारण्य नाहीसे झाले असले तरी त्याची महती कायम आहे; मात्र ही महतीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून होत नाही, यामुळे धार्मिक पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या पदरी निराशा येते. भारतामधील एकमेव पुरातन लक्ष्मण मंदिर तपोवनात आहे. या ठिकाणी रावणाची बहीण शूर्पणखेचे नाक लक्ष्मणाने कापले व ते गोदावरीत फेकले आणि या ठिकाणी रावणपुत्राचा वध करण्यासाठी लक्ष्मणाने तपश्चर्या केल्याचा उल्लेख रामायणात आढळतो. म्हणून या जागेला तपोवन असे नाव पडले; मात्र हे ‘तपोवन’ शोधावे कुठे अन् जाणावे कसे ? हाच प्रश्न सध्या येथे येणाºया पर्यटकांना पडत आहे.
गोदेच्या आरतीचा प्रस्ताव लालफितीत
राज्य पर्यटन महामंडळाने नाशिकच्या धार्मिक पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने हरिद्वारच्या धर्तीवर दहा लाख रुपयांचा गंगा आरतीचा प्रस्ताव मंजुरीसाठी मुख्य कार्यालयाकडे पाठविला. मात्र या गोदावरी आरतीचा प्रस्तावाला मंजुरी मिळून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. यामुळे धार्मिक पर्यटनवृध्दीसाठी मैलाचा दगड ठरणारा हा उपक्रम सुरू होण्याअगोदरच लालफितीत अडकला आहे. गोदावरीच्या आरतीचा उपक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवून वर्षभरापेक्षा अधिक काळ उलटला आहे. एकूणच राज्य पर्यटन मंत्र्यांचे अलीकडे शहरात झालेले दौरे अन् घोषणा बघता नाशिकच्या पर्यटनाला ‘अच्छे दिन’ कधी येणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Web Title: Kumbhnagiri Tourism 'Ram Bharose'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.