आडगाव रेपाळ येथे पाण्याअभावी डाळिंबबागांवर कु-हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 02:37 PM2019-06-12T14:37:50+5:302019-06-12T14:38:10+5:30
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात सलग दोन वर्षांपासून दुष्काळी स्थिती असल्यामुळे परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात सलग दोन वर्षांपासून दुष्काळी स्थिती असल्यामुळे परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे द्राक्ष, डाळिंबबागा तोडण्याचे सत्र शेतकऱ्यांकडून सुरूच आहे. अशाप्रकारे पाण्याअभावी तोडलेल्या डाळिंबबागांचे पंचनामे शासनाने करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच नारायण गुंजाळ यांनी केली आहे.
दुष्काळी स्थिती व पाणीटंचाईमुळे आडगाव रेपाळ परिसरात गेल्या चार-पाच महिन्यांपासून शेतकरी वर्गाने डाळिंबबागा तोडण्याचे सत्र सुरू केले आहे.बागा जगविण्यासाठी कुठेच पाणी उपलब्ध होत नसून या भागातील शेतकऱ्यांनी बागा तोडण्याचा सपाटा लावला आहे. पाण्याअभावी आपली सुमारे दोन एकर डाळिंबबाग करपल्याने व बाग वाचविण्यासाठी प्रयत्न करूनही पाणी उपलब्ध होत नसल्याने, टॅँकरनेही पाणी विकत मिळत नसल्याने आडगाव रेपाळ येथील शेतकरी किरण वाळूबा महाले यांनी आपल्या दीड एकर बागेतील झाडांवर कु-हाडीचे घाव घातले.