५८ वृक्षांवर कुऱ्हाडीचे घाव
By admin | Published: October 6, 2016 01:15 AM2016-10-06T01:15:36+5:302016-10-06T01:32:49+5:30
पर्यावरणप्रेमीच्या फार्महाउसमधील प्रकार
नाशिक : महापालिका क्षेत्रात सातत्याने ‘हिरवा वणवा’ या संस्थेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक भूमिका घेणाऱ्या राजन दातार यांच्या गंगापूररोडवरील फार्महाउसमध्ये तब्बल ५८ वृक्षांची बेकायदेशीरपणे तोड करण्यात आल्याने मनपाच्या उद्यान विभागामार्फत फार्महाउसचे मालक भालचंद्र वासुदेव दातार यांच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या वृक्षतोडीबद्दल महापालिकेकडून दातार यांना नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती विभागीय अधिकारी आर. आर. गोसावी यांनी दिली.
गंगापूररोडवर भालचंद्र दातार यांचा ‘दातार फार्म’ आहे. याठिकाणी सुरू प्रजातीची ३१ तर गुलमोहोर प्रजातीची २७ झाडे महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता तोडण्यात आल्याचे समोर आल्याने उद्यान विभागाचे निरीक्षक रमेश गायकवाड यांनी दातार यांच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी दातार फार्मचे मालक भालचंद्र दातार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर फार्म हा पर्यावरणप्रेमी आणि ‘हिरवा वणवा’ या संस्थेच्या माध्यमातून जागृतीचे काम करणारे सदस्य राजन दातार यांचा असल्याने वृक्षतोडीबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एका पर्यावरणप्रेमीकडूनच तब्बल ५८ वृक्षांवर कुऱ्हाड चालविली गेल्याने एकूणच चळवळीकडेही संशयाने पाहिले जाऊ लागले आहे.
महापालिकेच्या हद्दीत कोणत्याही वृक्षाची तोड करण्यासाठी मनपाच्या वृक्ष प्राधिकरण समिती व उद्यान विभागाची परवानगी घ्यावी लागते. विनापरवाना बेकायदेशीररीत्या कुणी वृक्षतोड केल्यास त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. त्यानुसार, दातार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना मनपामार्फतही नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती सातपूरचे विभागीय अधिकारी आर. आर. गोसावी यांनी दिली. (प्रतिनिधी)