दिवंगत ताऱ्यांनी उजळणार कुसुमाग्रज स्मारक!
By admin | Published: November 3, 2015 11:53 PM2015-11-03T23:53:00+5:302015-11-03T23:53:29+5:30
हृद्य : ‘प्रकाशयात्रा आठवणींची’ शुक्रवारी कार्यक्रम
नाशिक : दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येला शहरातील सांस्कृतिक क्षेत्रातील कलावंतांचे स्मरण करण्याच्या उद्देशाने कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी ६.३० वाजता ‘प्रकाशयात्रा आठवणींची’ या हृद्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कुसुमाग्रज स्मारकात हा कार्यक्रम होणार आहे.
कवी कुसुमाग्रजांचे रसिकांच्या हृदयातील अढळ स्थान लक्षात घेऊन तारांगणातील एका तेजस्वी ताऱ्याचे ‘कुसुमाग्रज’ असे नामांकन करण्यात आले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर विनायक रानडे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आकाराला आला आहे. दिवंगत झालेल्या शहरातील सांस्कृतिक क्षेत्रातील सुमारे दीडशे कलावंतांचे स्मरण या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे. या कलावंतांच्या आठवणींची त्यांच्या कुटुंबीयांसमवेत देवाणघेवाण व्हावी, त्यांच्या कार्याचा जागर व्हावा व रसिकांनाही माहिती व्हावी, असा कार्यक्रमाचा उद्देश आहे. यावेळी प्रत्येक दिवंगत कलावंताच्या स्मरणासाठी त्यांच्या कुटुंबीयांच्या हातून एक पणती प्रकाशमान केली जाणार असून, त्या कलावंताचे नाव असलेल्या आकाशकंदिलाने कुसुमाग्रज स्मारक उजळून टाकले जाणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रधार कैलास पाटील असून, दिग्दर्शक सचिन शिंदे, लेखक दत्ता पाटील, मनीष चिंधडे, श्याम पाडेकर, राजा पाटेकर, नवीन तांबट, सी. एल. कुलकर्णी, राजू पत्की आदि सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)