कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त तहहयात?

By admin | Published: September 27, 2015 12:19 AM2015-09-27T00:19:22+5:302015-09-27T00:19:57+5:30

घटनादुरुस्तीचा घाट : दहा वर्षे मुदतीचे कलम वगळणार

Kusumagraj Trust Trust Trustee? | कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त तहहयात?

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त तहहयात?

Next

नाशिक : पंचवीस वर्षांपूर्वी खुद्द कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या घटनेत बदल करण्याचा घाट घालण्यात आला असून, तसा प्रस्ताव लवकरच धर्मादाय आयुक्तांकडे पाठवला जाणार आहे. प्रतिष्ठानच्या घटनेत असलेले विश्वस्तपदाच्या दहा वर्षे मुदतीचे कलम वगळण्याचा निर्णय या दुरुस्तीद्वारे घेतला जाणार आहे. दरम्यान, खुद्द तात्यासाहेबांनी तयार केलेल्या घटनेलाच नख लावणारा हा बदल कशासाठी, असा संतप्त सवाल शहराच्या सांस्कृतिक वर्तुळातून उपस्थित होत आहे.
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी विशिष्ट उद्देश व कार्य डोळ्यांसमोर ठेवून कुसुमाग्रज प्रतिष्ठानची स्थापना केली. प्रतिष्ठानची घटना तात्यासाहेबांनी स्वत: लक्ष घालून तयार करवून घेतली. त्यात प्रतिष्ठानच्या विश्वस्तपदाचा कार्यकाळ पाच वर्षे असा निश्चित करण्यात आला. हा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला पुन्हा पाच वर्षांसाठी मुदतवाढ देता येते; मात्र एका व्यक्तीने दहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर तिला विश्वस्तपदावर राहता येत नाही. प्रतिष्ठानवर ठरावीक व्यक्तींनी वर्षानुवर्षे ठाण मांडून राहू नये, नव्या व्यक्तींनाही कामाची संधी मिळावी, असा दूरगामी विचार करून तात्यासाहेबांनी घटनेत सदर कलम नमूद केले होते; मात्र प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक व विश्वस्त मंडळाने हे कलमच वगळण्याचा घाट घातला आहे. कर्णिक यांनी गेल्या आॅगस्ट महिन्यात प्रतिष्ठानच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबतचा प्रस्ताव मांडला होता. त्याला सभासदांनी मान्यता देऊन यासंदर्भात अध्यक्ष कर्णिक, आमदार हेमंत टकले व अ‍ॅड. विलास लोणारी यांची समिती गठित करण्यात आली होती.
या समितीच्या दोन बैठका होऊन समितीने अहवाल सादर केला असून, त्यात सदर कलम वगळण्याची शिफारस केली आहे. हा अहवाल नुकत्याच झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आला.
विश्वस्तांनी त्याला मान्यता दिली असून, लवकरच यासंदर्भातील प्रस्ताव धर्मादाय आयुक्तांना पाठवला जाणार आहे. धर्मादाय आयुक्त याबाबत प्रक्रिया सुरू करून हरकती मागवतील. हरकती प्राप्त झाल्यास त्यावर सुनावणी होऊन निर्णय जाहीर केला जाईल. या सगळ्या प्रक्रियेला सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Kusumagraj Trust Trust Trustee?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.