संयुक्त महाराष्ट्रासाठी झाली होती कुसुमाग्रजांना अटक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:14 AM2021-05-01T04:14:12+5:302021-05-01T04:14:12+5:30
नाशिक : संयुक्त महाराष्ट्रासाठी १९६० पूर्वी राज्यात ज्या नेतृत्वाने रान उठवले त्यात एस. एम्. जोशी, भाई श्रीपाद अमृत डांगे, ...
नाशिक : संयुक्त महाराष्ट्रासाठी १९६० पूर्वी राज्यात ज्या नेतृत्वाने रान उठवले त्यात एस. एम्. जोशी, भाई श्रीपाद अमृत डांगे, ना. ग. गोरे, उद्धवराव पाटील, माधवराव बागल, प्रबोधनकार ठाकरे, जयंतराव टिळक यांचा प्रामुख्याने समावेश होता. हे सर्वज्ञात असले तरी आचार्य प्र. के. अत्रे, शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्यासारख्या तत्कालीन ज्येष्ठ, श्रेष्ठ साहित्यिकांनीदेखील संयुक्त महाराष्ट्रासाठी आंदोलनात योगदान दिले होते. त्याचप्रमाणे अवघ्या महाराष्ट्राचे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनीदेखील त्या काळी नाशिकला झालेल्या सत्याग्रहाच्या आंदोलनात सहभाग नोंदवल्यामुळे त्यांना अटक झाली होती.
नाशिकमध्ये साठच्या दशकात संयुक्त महाराष्ट्राच्या समर्थनासाठी मिरवणुका आणि शोभायात्रा सातत्याने निघत होत्या. कुसुमाग्रज हे जनभावनांच्या वास्तवाशी जोडलेले आणि जनसामान्यांमध्ये राहणारे कवी होते. त्यामुळे नाशकातही सातत्याने आंदोलने होऊ लागल्यावर त्यांनीदेखील एका आंदोलनाचे नेतृत्व केले होते. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्रासाठी तात्यासाहेबांनी सत्याग्रह केला ही त्या दिवशाची सर्वात मोठी घटना होती. पोलिसांनी त्यांना अटक करून कोर्टात उभे केले होते. कोर्टात उभे राहिल्यानंतर तत्कालीन न्यायाधीशांनी त्यांना गुन्हा कबूल आहे का , असे विचारले. त्यावेळी तात्यासाहेबांनी गुन्हा कबूल केला. तेव्हा कोर्टाने त्यांना कोर्ट उठेपर्यंत न्यायालयातच बसून राहण्याची शिक्षा दिली होती. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटात कोर्ट बरखास्त करण्यात आल्याने त्यांची शिक्षादेखील संपु्ष्टात आली होती. ६१ व्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या जुन्या स्मृतींना उजाळा मिळत आहे.
इन्फो
दोघांचे हौतात्म्य
संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत ज्या १०५ वीरांनी हौतात्म्य पत्करले. त्यात नाशिकचे गणपत श्रीधर जोशी आणि माधवराव राजाराम तुरे (बेलदार) यांचा समावेश आहे. रविवार कारंजा भागात उसळलेल्या दंगलीनंतर झालेल्या गोळीबारात ते दोघे गोळी लागून गतप्राण झाले होते. तसेच चित्रमंदिर चित्रपटगृह परिसरात बाळासाहेब शेंडगे यांच्या पायाला गोळी लागल्याने त्यांचा पाय कायमचाच अधू झाला होता. त्याशिवाय नाशिकच्या आंदोलनात तत्कालीन सामाजिक कार्यकर्ते ॲड. दौलतराव घुमरे, रावसाहेब थोरात, ॲड. द. तु. जायभावे, इक्बाल हसरत, बी.डी. जाधव, शाहीर गजाभाऊ बेणी यांचादेखील समावेश होता.
फोटो
कुसुमाग्रज
महाराष्ट्र दिन विशेष