कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे शिरवाडे-वणी ‘कवितेचे गाव’ म्हणून घोषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 20:31 IST2025-02-27T20:31:05+5:302025-02-27T20:31:44+5:30

कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे गाव शिरवाडे- वणी कवितांचे गाव म्हणून घोषित करणे व कवितेच्या एका दालनाचे उद्घाटन आज झाले.

Kusumagraja Shirwade Vani declared as Village of Poetry | कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे शिरवाडे-वणी ‘कवितेचे गाव’ म्हणून घोषित

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे शिरवाडे-वणी ‘कवितेचे गाव’ म्हणून घोषित

Uday Samant: ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या नावाने शिरवाडे येथे पुढील वर्षापासून दोन दिवसीय कुसुमाग्रज महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल. या महोत्सवात ग्रामस्थांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असं आवाहन उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. मराठी भाषा विभाग, राज्य मराठी भाषा विकास संस्था आणि ग्रामपंचायत शिरवाडे- वणी (ता. निफाड) यांच्या संयुक्त विद्यमाने कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे गाव शिरवाडे- वणी कवितांचे गाव म्हणून घोषित करणे व कवितेच्या एका दालनाचे उद्घाटन आज झाले. त्यानंतर कुसुमाग्रज विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  
 
मंत्री उदय सामंत म्हणाले, कुसुमाग्रज यांचे गाव ‘कवितांचे गाव’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याचे पहिले दालन आज कार्यान्वित करण्यात आले. आगामी तीन ते चार महिन्यांत परिपूर्ण कवितांचे गाव निर्माण होईल. तेथे गावातील प्रत्येक विद्यार्थी गेला पाहिजे. त्यांनी कवितांचे वाचन केले पाहिजे. यामुळे वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यास मदत होईल. त्यामुळे अन्य गावांना प्रेरणा मिळेल, असे नियोजन करण्यात येईल. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिरवाडे येथे दरवर्षी कार्यक्रम होईल.

नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती आणि गनिमी कावा याविषयावर अध्यासन सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याबरोबरच आता तेथे कुसुमाग्रज यांच्या मराठी अध्यासन सुरू करण्यात येईल. ते लवकरच कार्यान्वित होईल, असेही त्यांनी सांगितले. आगामी काळात बाल, युवक आणि महिलांसाठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येईल. कवि विंदा करंदीकर साहित्यभूषण पुरस्कार वितरण सोहळा व्यापक स्तरावर घेण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार यंदाचा कार्यक्रम मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे होत असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी भाषा विभागातर्फे संत तुकाराम महाराज यांचे सर्व अभंग ई- बुक स्वरूपात लवकरच येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

दादा भुसे म्हणाले, ‘कवितेचे गाव’ या संकल्पनेतून कवी कुसुमाग्रज यांच्या शिरवाडे गावात पहिल्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. उर्वरित दालन लवकरच कार्यान्वित होतील. या दालनांच्या माध्यमातून कुसुमाग्रज यांचे साहित्य अभ्यासासाठी उपलब्ध होणार आहे. कुसुमाग्रज यांचे जन्मगाव शिरवाडेच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. त्यासाठी ग्रामपंचायतीने आराखडा तयार करावा. त्यानुसार निधी मंजुरीसाठी प्रयत्न केले जातील. मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे सुरू असलेल्या उपक्रमांची त्यांनी माहिती दिली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वप्नील खामकर लिखित पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. संचालक डॉ. देवरे यांनी प्रास्ताविक केले. स्वानंद बेदरकर यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दालन क्रमांक १ चे उद्घाटन

तत्पूर्वी मंत्री सामंत यांच्या हस्ते ‘कवितांचे गाव’च्या पहिल्या दालनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार श्री. बनकर, मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲड. ठाकरे यांच्यासह विद्यार्थी, ग्रामस्थ, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम, ढोल नृत्य सादर केले.
 

Web Title: Kusumagraja Shirwade Vani declared as Village of Poetry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.