के.व्ही.एन. नाईक कॉलेजतर्फे अनाथ बालिकाश्रमास मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:10 AM2021-04-29T04:10:45+5:302021-04-29T04:10:45+5:30
नाशिक : सामाजिक जाणीव म्हणून क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातर्फे आशीर्वाद ...
नाशिक : सामाजिक जाणीव म्हणून क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातर्फे आशीर्वाद सेवा भवन ट्रस्टचे अनाथ बालिकाश्रम, त्र्यंबकेश्वर येथे जवळपास १५ हजार रुपयाचे अन्नधान्य वाटप करण्यात आले.
त्यात प्रामुख्याने गहू, तांदूळ, बाजरी, साखर, तेल, डाळी, मठ, वाटाणे, हरभरा, पोहे, रवा, आदी अन्नधान्याचे आणि मास्कचे वाटपदेखील करण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळेस संस्थेचे संचालक विष्णुपंत नागरे यांनी सर्व देणगीदारांचे तसेच स्वयंसेवक करीत असलेल्या कामाचे कौतुक केले. सामाजिक अंतर जपत सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांना कोणत्या न कोणत्या प्रकारे मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत वाघ यांनी केले.
के. व्ही. एन नाईक महाविद्यालय मागच्या दोन वर्षापासून सतत असे कार्यक्रम राबविताना कोरोना काळातील महाविद्यालयाचा अनाथ आश्रमास मदतीचा हा चौथा उपक्रम आहे. त्याआधी सलग तीन वेळा शेतकरी आत्महत्याग्रस्त अनाथ बालकांचे आधारतीर्थ आश्रम येथे भेट देऊन मास्क, दिवाळीनिमित्त फराळ व कपडे वाटप तसेच मोठ्या प्रमाणात अन्नधान्य वाटप करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी अनाथ आश्रमास मदतीचा ओघ कमी झालेला आहे. त्यामुळे आपल्या जवळच्या अनाथ आश्रमाला वा गोरगरिबांना जास्तीत जास्त लोकांनी मदतीचा हात द्यावा, असा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला. मदतीसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉ. वसंत वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. समीन शेख व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
कोरोनाचे वाढते प्रमाण, रक्ताचा व प्लाझ्माचा तुटवडा, रुग्णांसाठी ऑक्सिजनची व बेडची कमतरता, खालावलेली आर्थिक परिस्थिती अशी अनेक संकटे आपल्यासमोर उभे राहिलेली आहेत. अशा परिस्थितीत के.व्ही.एन. नाईक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक प्लाझमादान व रक्तदान करतांना त्याबद्दल जनजागृती, उपलब्ध ऑक्सिजन बेडची माहिती पुरविण्याचे काम देखील करत आहे. कोरोना रुग्णांसाठी अन्न पुरविण्याचा व लसीकरण मोहिमेत मदत करण्याचा देखील प्रयत्न महाविद्यालयातर्फे करण्यात येणार आहे.