कामगार-कर्मचारी संघटनांचा आज देशव्यापी संप, मोर्चा
By admin | Published: September 2, 2016 12:03 AM2016-09-02T00:03:03+5:302016-09-02T00:03:23+5:30
कामगार-कर्मचारी संघटनांचा आज देशव्यापी संप, मोर्चा
सिन्नर : विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या देशव्यापी संपात येथील कामगार-कर्मचारी संघटनाही सहभागी झाल्या आहेत. कामगार, कर्मचाऱ्यांंनी मोर्चासाठी शनिवारी सकाळी १० वाजता हुतात्मा स्मारकात जमण्याचे आवाहन नाशिक जिल्हा कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
कामगार कायद्यातील कामगार विरोधी व मालकधार्जिणे बदल रद्द करा. कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी करा. बांधकाम कामगारांना विमा, पेन्शन, बोनस आणि शेतमजूर, घरकामगारांसह अन्य असंघटित कामगारांना नोंदणी करून कल्याण मंडळामार्फत आरोग्य, विमा, पेन्शन लागू करा. बांधकाम, घरेलू कामगार आदिंच्या कल्याणकारी मंडळाचे पुनर्गठण करून मान्यता द्या. कामगार संघटनांना मंडळावर सदस्यतेच्या आधारावर योग्य प्रतिनिधित्व द्या. सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण व विक्री रद्द करा. रेल्वे, विमा, किरकोळ व्यापार, औषधे, संरक्षण क्षेत्रातील थेट गुंतवणुकीचे धोरण मागे घ्या. पेन्शन योजना यासाठीचा निधी सट्टाबाजारात गुंतविण्याचा निर्णय मागे घ्या. आदिंसह विविध मागण्यांसाठी कामगार कर्मचारी संघटनांनी देशव्यापी संप पुकारला आहे. यावेळी काढण्यात येणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रभाकर गोळेसर, दत्ता वायचळे, संजय गाडे, देशमुख, हरिभाऊ तांबे यांनी केले आहे. (वार्ताहर)