कामगार कायद्यात लवकरच बदल
By admin | Published: May 22, 2015 11:01 PM2015-05-22T23:01:10+5:302015-05-22T23:01:42+5:30
मुख्यमंत्री फडणवीस : लघुउद्योग भारतीच्या अधिवेशनात घोषणा
नाशिक : राज्यातील प्रचलित कामगार कायदा हा कोणाच्याही हिताचा नाही. त्यामुळे या कायद्यात लवकरच बदल करण्यात येणार असून, कामगार आणि उद्योग दोघांना या माध्यमातून संरक्षण देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
लघुउद्योग भारतीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप पाइपलाइन रोडवरील नक्षत्र लॉन्स येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंट्टीवार, शालेय व उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि लघुउद्योग भारतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यातील प्रचलित कामगार कायदे हे कालबाह्य असून, त्या माध्यमातून कामगारांचे आणि उद्योजक दोघांचे प्रश्न सुटत नाही. केवळ वेळकाढूपणाच होत असतो. उलट अशा प्रकारच्या दबावामुळे आणि क्लिष्ट कायद्यामुळे उद्योग चालविणे अवघड जाते. त्याचाच विचार करून कामगार कायद्यात बदल करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगून त्यांनी राज्यात नुकतेच लघुउद्योग धोरण जाहीर करण्यात आले असून, १६ हजार उद्योजकांना इन्स्पेक्टर राजमधून मुक्ती देण्यात आली आहे.
कोणत्याही उणिवेची पूर्तता करण्यासाठी सेल्फ सर्टिफिकेशनची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे उद्योजकांना मानकांची माहिती दिल्यानंतर त्याच्या पूर्ततेबाबत सेल्फ सर्टिफिकेशनची सोय करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. राज्यात उद्योग व्यवसायांना पोषक वातावरण तयार करून महाराष्ट्र हा इंडस्ट्रीयल हब तयार करण्याचा प्रयत्न आहे.
मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्र अंतर्गत विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात होणार असून, त्या माध्यमातून मॅन्युफॅक्चरिंग हब महाराष्ट्रात व्हावा यासाठी प्रयत्न होत आहेत. सर्वाधिक संधी या उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना असून, त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
उद्योगांच्या दृष्टीने कौशल्यप्राप्त कामगार कर्मचारी उपलब्ध व्हावे यासाठी कौशल्याधिष्ठित प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे, परंतु केवळ अशा प्रकारे प्रशिक्षण देऊन चालणार नाही, तर उद्योगांना आवश्यक त्या धर्तीवर प्रशिक्षण मिळावे यासाठी उद्योग आणि सरकार यांच्या संयुक्त उपक्रमावर भर देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लघुउद्योग भारतीचे स्थानिक अध्यक्ष मारुती कुलकर्णी यांनी केले. संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भूषण वैद्य यांनी उद्योजकांच्या विविध मागण्या सादर केल्या. व्यासपीठावर योगेश कनानी, श्रीराम दांडेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)