अन्न व औषध प्रशासनाच्या लॅब’चे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 11:01 PM2018-08-31T23:01:57+5:302018-09-01T00:17:31+5:30

अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) मुंगसरे येथील दोन एकर जागेत अत्याधुनिक लॅब उभारण्याचा प्रस्ताव जवळपास दशकभरापासून सरकार दरबारी धूळ खात पडला आहे. नाशिकमधील अन्न पदार्थांचे नमुने तपासणी प्रयोगशाळा (फूड लॅब) गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे.

Labs of Food and Drug Administration | अन्न व औषध प्रशासनाच्या लॅब’चे भिजत घोंगडे

अन्न व औषध प्रशासनाच्या लॅब’चे भिजत घोंगडे

googlenewsNext

नाशिक : अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) मुंगसरे येथील दोन एकर जागेत अत्याधुनिक लॅब उभारण्याचा प्रस्ताव जवळपास दशकभरापासून सरकार दरबारी धूळ खात पडला आहे. नाशिकमधील अन्न पदार्थांचे नमुने तपासणी प्रयोगशाळा (फूड लॅब) गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे येथील अन्नपदार्थ पुणे, मुंबई अथवा भोपाळला पाठविण्यात येतात; मात्र नाशिकमध्ये प्रयोगशाळेसाठी जागा उपलब्ध असून, तेथे संरक्षक भिंतीचे कामही पूर्ण झालेले असताना इमारत बांधकामाच्या प्रस्तावावर गेल्या दशकभरात कोणतीही हालचाल न झाल्याने एफडीए लॅबचे घोंगडे भिजत पडले आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे काम थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आहे. दुर्दैवाने नाशिकमधील अन्नपदार्थ तपासणीची प्रयोगशाळा सुमारे १० वर्षांपासून बंद आहे. शहरातील सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या आरोग्य प्रयोगशाळेत अन्नपदार्थांऐवजी केवळ पाण्याच्याच नमुन्यांची तपासणी केली जाते. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांची अन्न सुरक्षा नाशिकमधील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयावर अवलंबून आहे. एफडीएच्या वतीने पाचही जिल्ह्यांतील अन्न आणि औषधांचे नमुने वेळोवेळी तपासणीसाठी ताब्यात घेण्यात येतात. नाशिकमधील लॅब बंद पडल्याने अन्नपदार्थांचे नमुने मुंबई, पुणे तसेच भोपाळ येथील प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येतात.  या नमुन्यांची १४ दिवसांत तपासणी होऊन त्यांचा अहवाल अपेक्षित असताना प्रत्यक्षात या प्रयोगशाळांवर असलेल्या भारामुळे साधारण दीड महिना किंवा त्यापेक्षा अधिक काळानंतर नमुन्यांचा अहवाल प्राप्त होतो. यामुळे एफडीएकडून कार्यवाहीलाही विलंब होतो. तत्कालीन जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांनी ही अडचण लक्षात घेऊन मुंगसरे येथील गट क्रमांक १६६मधील दोन एकर जागा २३ नोव्हेंबर २०११ रोजी एफडीएला दिली. या जागेत अत्याधुनिक लॅब तसेच स्टोअरेज व्यवस्था उभारण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव एफडीएच्या अधिकाऱ्यांनी शासन दरबारी पाठविला; मात्र त्याचा तितकासा उपयोग होताना दिसत नाही. सध्या या जागेवर संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करण्यात आले असून, त्यालाही दोन वर्ष उलटले आहे. परंतु, प्रत्यक्ष प्रयोगशाळेच्या इमारतीच्या प्रस्तावाला अद्यापही मंजुरी मिळालेली नसून प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतरच इमारतीचे बांधकाम सुरू होऊ शकणार आहे.
मुंगसरे येथील दोन एकर जागेत संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. या जागेत फूड लॅब तसेच गुदामाच्या इमारतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला असून, लवकरच त्यास मंजुरी मिळू शकते. मंजुरी मिळाली की बांधकाम सुरू होईल.  - उदय वंजारी, सहआयुक्त, एफडीए  प्रयोगशाळेला प्राधान्य का नाही?
मुंगसरे येथे एफडीएला जागा मिळाली. त्यानंतर केवळ संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले. एफडीएची लॅब नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असताना या कामाला प्राधान्य मिळत नसल्याने सरकारने जाणीवपूर्वक हा प्रश्न रेंगाळत ठेवला आहे की, एफडीएच्या अधिकाºयांना ही जबाबदारीच नको आहे, असा सवाल प्रयोगशाळेच्या इमारतीला होणाºया दिरंगाईमुळे उपस्थित केला जात आहे.

Web Title: Labs of Food and Drug Administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.