गडावरील विद्यालयामध्ये सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 12:42 AM2020-01-08T00:42:02+5:302020-01-08T00:44:28+5:30
सप्तशृंगगड : गेल्या अनेक वर्षांपासून सप्तशृंगी देवीच्या गडावर अनुदानित आदिवासी सेवा समतिी नाशिक, संचिलत ओम दत्तश्री ठाकूर महाराज माध्यमिक ...
सप्तशृंगगड : गेल्या अनेक वर्षांपासून सप्तशृंगी देवीच्या गडावर अनुदानित आदिवासी सेवा समतिी नाशिक, संचिलत ओम दत्तश्री ठाकूर महाराज माध्यमिक विद्यालय सुरु करण्यात आले आहे. मात्र स्थापनेपासून अद्यापपर्यंत या शाळेतील व निवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी शौचालयासह इतर भौतिक सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या शाळेकडे संस्थाचालकांसह जिल्हा व तालुका शिक्षण विभागाचे दुर्लक्ष आहे. या नवीन वर्षात तरी विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळतील का असा सवाल स्थानिक नागरिक व विद्यार्थांनी उपस्थित केला आहे.
सप्तशृंगी गड ता कळवण येथे १९९२ पासून सप्तशृंगी देवीच्या गडावर अनुदानित आदिवासी सेवा समतिी नाशिक, संचिलत ओम दत्तश्री ठाकूर महाराज माध्यमिक विद्यालय सुरु करण्यात आले आहे. या शाळेत इयत्ता 5 वि ते 10 वि या वर्गात २१४ विदयार्थी शिक्षण घेत आहेत. पैकी ८५ विद्यार्थी शाळेलगत असलेल्या वस्तीगृहात व शाळेतील दोन वर्ग खोल्यामध्ये निवासी शिक्षण घेत आहेत. मात्र संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांसाठी कोणत्याच भौतिक सुविधांची व्यवस्था केलेली नाही.
येथील विद्यार्थी शौचासाठी शाळेच्या पाठीमागील भागातच उघड्यावर जात असल्याने शाळा परिसरसह गावातही दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच निवासी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आंघोळीसाठी बंदीस्त बाथरूमची व्यवस्था नाही सर्व विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्या आहेत. त्याच ठिकाणी उघड्यावर अंघोळ करावी लागत आहे.
तसेच वसतिगृहातील खालच्या खोल्यांमध्ये स्वत: कर्मचारी राहत असून वरच्या एक हॉलमध्ये विद्यार्थी राहत आहेत. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असलेला जिना जीर्ण झाला असून तो कोणत्याही क्षणी कोसळू शकतो. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके उपसरपंच राजेश गवळी यांनी शालेय प्रशासन व संस्थाचालकांकडे सुविधांबाबत तक्र ार केली आहे.
मात्र लवकरच काम करू असे सांगून वेळकाढू धोरण अवलंबले आहे. या शाळेवर ५ वी ते १० वीचे सहा वर्ग असून या विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापकांसह सहाच शिक्षक असल्याने शिक्षकांचीही कमतरता आहे. या शाळेपासूनच गटारीचे पाणी उघड्यावर वाहत असल्याने दलदल तयार झाली आहे. शाळेला संरक्षण भिंत नसल्याने विद्यार्थांच्या संरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. या सर्व समस्यांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे.
१९९२ पासून सुरु असलेल्या अनुदानित शाळेत नवीन वर्षामध्ये तरी शासनाला जाग येऊन येथील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळतील का असा सवाल आदिवासी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांना पडला आहे.
मुख्याध्यापक व वसतिगृह अधीक्षक यांचे उडवाउडवीची उत्तरे
शाळा सुरु झाल्यापासून शालेय विद्यार्थी व वसतिगृहातील निवासी विद्यार्थी यांच्यासाठी अद्यापपर्यंत शौचालयाची व्यवस्था नाही. याबाबत त्यांना विचारणा केली असता. सद्या विद्यार्थी सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे सार्वजनिक शौचालयाचा वापर करीत असल्याचे सांगितले. मात्र शाळेचे व ट्रस्टच्या सार्वजनिक सौचालयाचे अंतर भरपूर लांब आहे. येथील निवासी विद्यार्थ्यांकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सर्वच विद्यार्थी उघड्यावर शौचास जात असल्याची माहिती दिली.
आम्ही संस्थेच्या मुख्यालयात पत्रव्यवहार करून शौचालयाचे कामासाठी निधीची मागणी केली होती. आता काम प्रगतीपथावर आहे. इतर सुविधांसाठीही पाठपुरावा सुरु आहे.
- डी. एन. नवले, मुख्याध्यापक.
वसतिगृहाचे जिण्यासाठी संस्थाचालकांशी पत्रव्यवहार केला आहे. लवकरच जिण्याचे काम केले जाईल.
- प्रवीण सावंत, अधीक्षक.