मानूर कोविड सेंटरमध्ये मनुष्यबळाअभावी मृतदेहाची हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:14 AM2021-04-17T04:14:33+5:302021-04-17T04:14:33+5:30
कळवण शहरातील रामनगरमधील व्यक्तीला १३ एप्रिल रोजी श्वास घेण्याचा त्रास जाणवला. प्रथम खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. त्रास जास्त वाढल्याने ...
कळवण शहरातील रामनगरमधील व्यक्तीला १३ एप्रिल रोजी श्वास घेण्याचा त्रास जाणवला. प्रथम खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. त्रास जास्त वाढल्याने संध्याकाळी ७ वाजेच्या दरम्यान मानुर कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्यांची कुठलीही तपासणी अथवा स्वॅब न घेता इतर उपचार सुरू ठेवल्याची नातेवाइकांची तक्रार आहे. १५ एप्रिल रोजी त्यांना जास्त प्रमाणात त्रास होऊन त्यांचा सकाळी १० वाजता मृत्यू झाला.
दरम्यान, या रुग्णाला सेंटरमध्ये दाखल केले त्या वेळी त्यांची ऑक्सिजन लेव्हल ही ६०-६५ दरम्यान होती. त्यांना ऑक्सिजन देण्यात येऊन औषध उपचार करण्यात येत होते. मात्र त्यांच्या प्रकृतीने औषधोपचारास प्रतिसाद दिला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोविड सेंटरमध्ये दिवसागणिक रुग्ण वाढत आहेत. मनुष्यबळाचा अभाव असून कर्मचारी व वैद्यकीय यंत्रणेची वानवा असल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह तासभर सेंटर परिसरात पडून असल्याचे समोर आले आहे.
सफाई कर्मचारी नसल्याने मृतदेहास कोणी हात लावत नव्हते. नातेवाइकांनी बाहेरील मेडिकलमधून पी.पी.ई. किट आणून ते स्वतः परिधान करून मृतदेह साध्या प्लास्टीकमध्ये गुंडाळून रुग्णवाहिकेमध्ये ठेवून नंतर कळवण येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या मृतदेहाचे शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करणे गरजेचे असताना या नियमाला तिलांजली दिली गेली. मृतदेहाची हेळसांड झाल्याबद्दल नातेवाइकांनी नाराजी व्यक्त केली.