नियोजन नसल्याने जेलरोडला अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:53 AM2019-11-19T00:53:18+5:302019-11-19T00:53:40+5:30
नाशिकरोड परिसराचा अविभाज्य घटक असलेल्या जेलरोड पाण्याच्या टाकीपासून थोरात पेट्रोलपंपापर्यंत अतिक्रमित भाजीबाजार बसला आहे.
नाशिकरोड परिसराचा अविभाज्य घटक असलेल्या जेलरोड पाण्याच्या टाकीपासून थोरात पेट्रोलपंपापर्यंत अतिक्रमित भाजीबाजार बसला आहे. आपल्या भागातील मनपाच्या खुल्या जागेत भाजीबाजार नको अशी भूमिका दरवेळी प्रत्येक ठिकाणी घेण्यात आल्याने आजी-माजी नगरसेवकांनी रहिवाशांची (मतदार) नाराजी नको म्हणून याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. जेलरोड पाण्याच्या टाकीपासून अतिक्रमित भाजीपाला विक्रेत्यांना के. एन. केला शाळेशेजारील मनपाने आपली जागादेखील निश्नित केली. त्याठिकाणी मुरूम टाकून जागा सपाटीकरण करून पथदीपदेखील लावण्यात आले. मात्र शाळेशेजारी असलेल्या भाजीबाजाराला नेहमीप्रमाणे विरोध करण्यात आला. परंतु जेलरोडवर नवीन भाजीविक्रेते अतिक्रमण करून व्यवसाय थाटू लागले. त्यामुळे शाळेशेजारील भाजीबाजाराची जागा पुन्हा ओसाड पडून विक्रेते रस्त्यावरच दुकाने थाटतात. काही वर्षांपूर्वी जेलरोड शिवाजी पुतळा चौकातून राजराजेश्वरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवीन भाजीविक्रेत्यांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली होती. त्या अतिक्रमणावरून अनेकवेळा आवाज उठल्यानंतर जेलरोड पंचक शनिमंदिराजवळ भाजीबाजार शेड उभारून त्याठिकाणी अतिक्रमित भाजीबाजार स्थलांतरित करण्यात आला. मात्र आता त्या ठिकाणी भाजीपाला विक्रेत्यांची संख्या वाढली असून, पंचक शनिमंदिर भाजीबाजार शेड अपुरे पडत असल्याने दसक-पंचक शिवरोडवर भाजीविक्रेत्यांचे अतिक्रमण झाले आहे. तसेच जेलरोड-सायखेडा रोडवरील विठ्ठल मंगल कार्यालय ते अभिनव आदर्श शाळापर्यंत गेल्या पाच-सहा वर्षांपासून रस्त्यावर अतिक्रमित भाजीबाजार भरत आहे.
दुर्गा उद्यान भाजीबाजार शेड बनला अड्डा
मनपा विभागीय कार्यालयाशेजारील दुर्गा उद्यान भाजीबाजार शेड मनपाकडून बनविण्यात आले. मात्र त्या ठिकाणच्या व्यवसायाची गरज लक्षात घेऊन दुर्गा उद्यान भाजीबाजाराला चहूबाजूकडून रस्ता न दिल्याने प्रवेशद्वारावरील विक्रेत्यांचा व्यवसाय होतो. त्यामुळे पाठीमागील शेडमधील भाजीविक्रेत्यांचा व्यवसाय होत नसल्याने त्यांना नाइलाजास्तव रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय थाटावा लागतो. सध्याच्या परिस्थितीत दुर्गा उद्यान भाजीबाजार शेड मद्यपी, गांजा, व्हाईटनर, जुगारी यांचा अड्डा झाला आहे. दुर्गा उद्यान भाजीबाजार शेडमध्ये विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात जागा आहे. पण फळ व भाजीपाला विक्रेत्यांनी शेडमधील दुकाने बंद करून मनपा विभागीय कार्यालयाशेजारील दुर्गा उद्यान भाजीबाजार प्रवेशद्वाराच्या रस्त्यावरच दुतर्फा अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत.