नाशिकच्या मुस्लीम कब्रस्तानमध्ये सेवा-सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 04:16 PM2018-02-10T16:16:27+5:302018-02-10T16:17:21+5:30
दोन वर्ष उलटूनही महापालिकेने करारात कबूल केलेल्या सोयीसुविधा दिलेल्या नाहीत
नाशिक : दफनविधीसाठी सिडको मस्जिद ट्रस्टला पाथर्डी शिवारात दिलेल्या जागेत सहा महिन्यांत सेवासुविधा उपलब्ध करून देण्याचा करार महापालिकेने फेब्रुवारी २०१६ मध्ये केला होता. मात्र, दोन वर्ष उलटूनही महापालिकेने करारात कबूल केलेल्या सोयीसुविधा दिलेल्या नाहीत.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिक महापालिकेने पाथर्डी शिवारातील १२ हजार चौरस मीटर क्षेत्र मुस्लीम कब्रस्तानचे वापरासाठी सन २०१३ मध्ये कब्जा पावतीने सिडको मस्जिद ट्रस्टला ताब्यात दिलेले आहे. त्यानंतर महापालिका आणि सिडको मस्जिद ट्रस्ट यांच्यात १६ फेब्रुवारी २०१६ मध्ये करारनामा झाला. करारनाम्यानुसार कब्रस्तानसाठी जागेची लेव्हलिंग करणे, जागेचे वॉल कंपाउंड करणे, अंतर्गत रस्ते तयार करणे, पुरेसे विजेचे खांब बसविणे, स्वतंत्र वीजपुरवठा पुरविणे, स्वतंत्र पाणी कनेक्शन देणे, जनाजा ठेवण्यासाठी जागा, नमाज पठणासाठी योग्य त्या मोजमापाचे हॉल, वजूखाना, स्वच्छतागृह आदी सुविधा करारनाम्याच्या तारखेपासून सहा महिन्यांत देण्याचे महापालिकेने स्पष्टपणे लिहून दिलेले आहे. तसेच जनाजा नेण्यासाठी शववाहिका उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही महापालिकेने स्वीकारलेली होती. मात्र, महापालिकेने करारात कबूल केलेल्या सोयीसुविधा अद्याप दिलेल्या नसल्याने मुस्लीम समाज बांधवांमध्ये नाराजीचा सूर आहे. सदर ठिकाणी महापालिकेने दोन वर्षांपूर्वी मान्य केलेल्या सर्व सेवासुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शिवसेना नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्यासह नागरिकांनी यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.