जागांअभावी निर्माण होणार प्रवेशाचा पेच; सीईटीची वेबसाइटही बंद, पण तयारी झाली का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:10 AM2021-07-24T04:10:59+5:302021-07-24T04:10:59+5:30
नाशिक : दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर नव्या मूल्यमापन पद्धतीद्वारे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात ...
नाशिक : दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर नव्या मूल्यमापन पद्धतीद्वारे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात विक्रमी संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत; परंतु आता या विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमात सामावून घेण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर निर्माण झाले आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य व विज्ञान शाखांमध्ये अकरावी प्रवेशासोबतच, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध आहेत; परंतु या सर्व अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध जागांच्या तुलनेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सुमारे साडेसात हजारांहून अधिक आहे. त्यामुळे या साडेसात हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शिक्षण विभागाने २१ ऑगस्टला ११ ते १ वाजेदरम्यान सीईटी घेण्याचा निर्णय घेतला असला तरी या सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वीच संकेतस्थळ बंद करण्यात आले आहे. तांत्रिक अडचणींमुळे संकेतस्थळ बंद करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी परीक्षेची तयारी झाली किंवा कसे, याविषयी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही.
---
दहावी पास विद्यार्थी - ९२२१०
अकरावीसाठी एकूण जागा - २५२७०
कला शाखा - ४९१०
वाणिज्य शाखा - ८६००
विज्ञान शाखा - १०१६०
---
सीईटी वेबसाइट हँग
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, मूल्यांकनानुसार दहावीचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा मात्र बंधनकारक करण्यात आली आहे. सीईटीचे अर्ज भरण्यासाठीची वेबसाइट बुधवारी हँग झाली होती. त्यामुळे मंडळाने तूर्तास नोंदणीची प्रक्रिया बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हटल्यामुळे पालक आणि विद्यार्थी संभ्रमात सापडले आहेत.
--
सीईटीची तयारी कशी कराल?
अकरावी प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी विद्यार्थी राहत असलेल्या परिसराजवळची केंद्रे देण्यात येणार असून, त्या केंद्रांवर जाऊन विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. ही परीक्षा एकूण १०० गुणांची होणार असून, इंग्रजी, विज्ञान, गणित आणि समाजशास्त्रे या चार विषयांवर आधारित १०० प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यासाठी राज्य माध्यमिक मंडळाकडून अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला आहे. सीईटी सात वेगवेगळ्या माध्यमांतून देता येणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज करताना संबंधित माध्यम निवडणे बंधनकारक असणार आहे. इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती, तेलुगू, उर्दू, कन्नड, सिंधी, अशा भाषांचे पर्याय विद्यार्थ्यांना निवडता येतील. या भाषांची प्रश्नावली विद्यार्थ्यांना देण्यात येईल. जर विद्यार्थ्यांनी सेमी इंग्रजी माध्यम निवडले तर इंग्रजी, विज्ञान आणि गणिताचे प्रश्न इंग्रजीत असतील, तर समाजशास्त्राचे प्रश्न हे विद्यार्थ्याने निवडलेल्या भाषेत विचारले जातील. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना तयारी करण्याचा सल्ला शिक्षणतज्ज्ञांनी दिला आहे.