रमाबाई आंबेडकर झोपडपट्टीत शौचालयांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:38 AM2019-05-12T00:38:03+5:302019-05-12T00:38:37+5:30
देवळालीगाव मालधक्कारोड मातोश्री रमाबाई आंबेडकर झोपडपट्टी परिसरात अस्वच्छता, तुंबलेल्या गटारी, दुर्गंधी, सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था, बंद पथदीप अशा रहिवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक समस्या पाचवीला पुजलेल्या आहेत.
समस्यांचा फेरा
देवळालीगाव
नाशिकरोड : देवळालीगाव मालधक्कारोड मातोश्री रमाबाई आंबेडकर झोपडपट्टी परिसरात अस्वच्छता, तुंबलेल्या गटारी, दुर्गंधी, सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था, बंद पथदीप अशा रहिवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक समस्या पाचवीला पुजलेल्या आहेत. नगरसेवक व मनपा प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने रहिवाशांना कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
देवळालीगाव मालधक्कारोड राजवाड्याशेजारी मातोश्री रमाबाई आंबेडकरनगरमधील रहिवासी मनपाचा सर्व प्रकारचा कर भरतात. मात्र तेथील अस्वच्छता व नागरी समस्या मार्गी लावण्याबाबत कोणीच गांभीर्याने लक्ष देऊन काम न केल्याने दिवसेंदिवस अस्वच्छता वाढत आहे. त्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दाट लोकवस्ती, छोटे गल्लीबोळ, बसकी घरे यामुळे या भागातील स्वच्छतेचा मुख्य प्रश्न असून याकडे मनपाने नियोजनपूर्वक लक्ष देण्याची गरज असल्याचे कविता गायकवाड यांनी सांगितले.
आंबेडकरनगर भागातील बहुतांश पथदीप बंद असल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. नवीन पोल उभे केले आहेत. मात्र त्यावर बल्बच लावलेले नसल्याचे उषा पाराशरे यांनी सांगितले. छोट्या गल्लीबोळामुळे व दाट लोकवस्तीमुळे छोटी वाहने असलेल्या घंटागाडी पाठवून केरकचरा संकलित करण्याची गरज असल्याचे हिराबाई भोसले, प्रेरणा जाधव यांनी सांगितले.
शौचालयाची संख्या रहिवासी संख्येच्या मानाने अत्यंत कमी आहे. त्यात शौचालयाची दारे तुटली असून अस्वच्छ असल्याने महिलांची मोठी गैरसोय होत असल्याचे आशा घुसळे यांनी स्पष्ट केले.
आंबेडकर भागात अत्यंत गोरगरीब, सर्वसामान्य राहात असल्याने या ठिकाणी विविध कार्यक्रम, उपक्रमांसाठी समाजमंदिर उभारणे गरजेचे असल्याचे अमोल चंद्रमोरे, प्रशांत गांगुर्डे यांनी सांगितले. तर रहिवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने ग्रीन जीम बसविल्यास खूप फायदा होईल, असे कुणाल साळवे यांनी स्पष्ट केले. झोपडपट्टी भागाची नियोजनपूर्वक स्वच्छता व जनजागृती करून कायापालट करण्याची गरज आहे, असे शशी धिवरे यांनी सांगितले. (उद्यांच्या अंकात : संतोषीमातानगर, सातपूर)
आंबेडकरनगर भागात नियमित स्वच्छता होत नसल्याने केरकचरा साचत आहे. छोटी-छोटी घरे असल्याने केरकचऱ्यासाठी कचराकुंडीची सुविधा उपलब्ध करून दिल्यास परिसरातील दुर्गंधी नाहीशी होईल.
- किरण गायकवाड
जुना परिसर व झोपडपट्टी भाग लक्षात घेऊन मनपाने या भागाचा आतातरी कायापालट करण्यासाठी काहीतरी नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे. या भागातील नागरी समस्या जैसे थे आहेत.
- जयाबाई आहिरे
परिसरातील बहुतांश पथदीप बंद पडले असून अंधाराचे साम्राज्य पसरल्याने सायंकाळनंतर महिलांची मोठी गैरसोय होत आहे. नवीन पथदीपांचे खांब बसविले असून त्याला मात्र अद्याप बल्ब बसविण्यात आले नाही.
- पुष्पा चंद्रमोरे
परिसरातील रहिवासी, युवक, महिला, लहान मुले यांच्यासाठी व्यायाम, खेळणे, मनोरंजन याकरिता कुठलीही साधने नाहीत. रहिवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेसोबत ग्रीन जीम बसविल्यास सर्वांनाच त्याचा मोठा फायदा होईल.
- प्रशांत रोकडे
आंबेडकरनगर भागात छोटी-छोटी बैठी घरे व गल्लीबोळ असून, जुन्या गटारी आहेत. घरापुढूनच जाणाºया गटारींची नियमित स्वच्छता होत नसल्याने त्या तुंबून दुर्गंधी पसरत आहे. रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- कमलबाई गाडेकर
परिसरातील रहिवाशांची संख्या लक्षात घेऊन सार्वजनिक शौचालय अपुरे पडत आहे. शौचालयाची दुरवस्था झाल्याने महिलांची मोठी गैरसोय होत आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे.
- नीलेश कटारे