जुना सायखेडारोड भागात नागरी सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:40 AM2018-08-27T00:40:15+5:302018-08-27T00:42:21+5:30

जेलरोड जुना सायखेडारोड येथील वागेश्वरीनगर, पवारवाडी, भैरवनाथनगर, किसनराव बोराडे वसाहत परिसर चांगल्या प्रमाणात लोकवस्ती वसली आहे. मात्र त्यामानाने अंतर्गत कॉलनी रस्ते छोटे असल्याने रहिवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

 Lack of urban facilities in the old Sikhedrod area | जुना सायखेडारोड भागात नागरी सुविधांचा अभाव

जुना सायखेडारोड भागात नागरी सुविधांचा अभाव

googlenewsNext

नाशिकरोड : जेलरोड जुना सायखेडारोड येथील वागेश्वरीनगर, पवारवाडी, भैरवनाथनगर, किसनराव बोराडे वसाहत परिसर चांगल्या प्रमाणात लोकवस्ती वसली आहे. मात्र त्यामानाने अंतर्गत कॉलनी रस्ते छोटे असल्याने रहिवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. बंद पथदीप, खुल्या जागेचा न झालेला विकास, रेल्वे लाइनलगत टाकण्यात येणारा केरकचरा, घाण यामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत.  जेलरोड प्रभाग १८ मधील जुना सायखेडा रोडवरील वागेश्वरीनगर, पवारवाडी, भारतभूषणनगर, किसनराव बोराडे वसाहत आदी परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वसली आहे. किसनराव बोराडे वसाहतीत एस. बी. प्लाझा, लक्ष्मीहित सोसायटी, विनायक सोसायटी, धनराज रो-हाउस, शिल्पदर्शन सोसायटी आदी रहिवासी इमारती, बंगले आहेत. मात्र अंतर्गत कॉलनी रस्ते अत्यंत छोटे आहेत. दिवसागणिक या भागातील लोकवस्ती वाढत असून, नव्याने इमारती उभ्या राहात आहेत. त्यामुळे मनपा प्रशासनाने कॉलनी रस्त्याचे नियोजन आतापासूनच करणे गरजेचे आहे.  भारतभूषण सोसायटीत जाणारा रस्ता हा मूळ रस्त्याच्या रुंदीपेक्षा छोटा आहे. खुल्या जागेचा विकास न केल्याने त्या जागा तशाच पडून आहेत तर काही ठिकाणी मनपाच्या खुल्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. काही ठिकाणचे पथदीप चालू- बंद स्थितीत असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. जुना सायखेडा रोड, पवारवाडी, ज्योतलक्ष्मी अपार्टमेंटच्या शेजारी व समोर सायखेडा रोडचे रुंदीकरण करण्यात आलेले नाही. त्या ठिकाणची जागा मनपाने ताब्यात न घेतल्याने त्या ठिकाणी रस्ता अरुंद आहे. पवारवाडी, वागेश्वरीनगर परिसरातदेखील कॉलनी अंतर्गत रस्ते अरुंद रस्त्यामुळे रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
पवारवाडी भव्य हाईट्स सोसायटी रस्त्यांचे काम झालेले नाही. पवारवाडी रेल्वे लाईनलगत मोठ्या प्रमाणात केरकचरा, घाण आणून टाकली जात असल्याने परिसरात सतत दुर्गंधी पसरलेली असते. मनपा आरोग्य विभागाला अनेकवेळा तक्रार करूनदेखील सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई केली जात नसल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे.  जुना सायखेडा रोडने मनपा व एकलहरा ग्रामपंचायत हद्दीपर्यंत लोकवस्ती झपाट्याने वाढू लागली आहे. जेलरोड भागात जादा प्रमाणात जागा शिल्लक नसल्याने या भागात सोसायटी, बंगले, घरे निर्माण होऊ लागली आहे. खासगी खुल्या जागेत घाण साचली असून गाजरगवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नव्याने विकसित होत असलेल्या या नागरी वसाहतीत विविध समस्या असून, रहिवाशांच्या देखील मनपाच्या खुल्या जागेबाबत अनेक अपेक्षा आहेत. जुना सायखेडारोड रस्ता दुभाजकांमध्ये शोभिवंत झाडे लावणे गरजेचे आहे.

Web Title:  Lack of urban facilities in the old Sikhedrod area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.