लडाख वारीने जीवन केले समृद्ध : हृषिकेश पाळंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 01:50 AM2018-03-02T01:50:23+5:302018-03-02T01:50:23+5:30
नाशिक : लडाखमध्ये लोकजीवन, तो प्रदेश जाणून घेताना आलेले अनुभव व त्या अनुभवावर आधारित पुस्तक माझे जीवन समृद्ध करणारे ठरले, असे प्रतिपादन लेखक हृषिकेश पाळंदे यांनी केले.
नाशिक : लडाखमध्ये चार महिने वास्तव्य करून तेथील लोकजीवन, तो प्रदेश जाणून घेताना आलेले अनुभव व त्या अनुभवावर आधारित पुस्तक माझे जीवन समृद्ध करणारे ठरले, असे प्रतिपादन लेखक हृषिकेश पाळंदे यांनी केले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये मराठी दिनानिमित्त ‘कुसुमाग्रज स्मरण’ सप्ताहातील तिसरे पुष्प गुरुवारी (दि. १) या संवाद कार्यक्रमाने गुंफण्यात आले. हर्षवर्धन कडेपूरकर यांनी पाळंदे यांची मुलाखत घेतली. पाळंदे पुढे म्हणाले की, लडाख खूप वेगळा प्रदेश आहे. मुख्य हिमालय रांगांच्या पुढे असणाºया या भागात ढग पोहोचत नसल्याने पाऊस फार कमी पडतो. ढगफुटीची मात्र भीती असते. अशा प्रदेशातील लोकजीवन, वातावरण, संस्कृती, राहणीमान हे सारे अनोखे होते. हे अनुभवण्याची उत्सुकता मला आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक समस्या पार करत तिथपर्यंत घेऊन गेल्या. तिथल्या अनुभवानंतर पुस्तक लिहिण्याची इच्छा झाली व त्यातून पुस्तक आकाराला आले. अहमदाबाद ते जम्मू हा अनुभवही खूप जबरदस्त होता. २३ दिवस अखंडपणे हा दौरा केला. त्यादरम्यान खूप चांगले अनुभव आले. ते अनुभव पुस्तकात शब्दबद्ध केले. लडाखची ओढ याच प्रवासातून निर्माण झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे यासाठी शिष्यवृत्ती मिळाली याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला. ग्रामीण लोकजीवन जाणून घेण्याची उत्सुकता, प्रत्यक्ष भटकंती करताना येणारे अनुभव, ते शब्दबद्ध केल्यानंतर मिळणारे समाधान यामुळे अधिकाधिक लेखन करण्यास प्रेरणा मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. मकरंद हिंगणे यांनी सूत्रसंचालन, तर प्रतिष्ठानचे कार्यवाह किशोर पाठक यांनी स्वागत केले. याप्रसंगी प्रतिष्ठानचे सदस्य, नागरिक उपस्थित होते.