कन्या राशीच्या व्यक्तींची संपणार साडेसाती
By admin | Published: October 30, 2014 11:40 PM2014-10-30T23:40:06+5:302014-10-30T23:40:21+5:30
शनिपालट : रविवारपासून धनु रास शनीच्या कचाट्यात; तूळ राशीचा अडीच वर्षांचा काळ शिल्लक
नाशिक : ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेबाबत भलेही मतप्रवाह असतील; परंतु शनिदेवाची वक्रदृष्टी आपल्यावर पडू नये म्हणून शनीची उपासना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे करणारे सभोवताली असतातच. राजा असो वा रंक, शनीच्या साडेसातीच्या फेऱ्यात जो अडकला त्याचा कार्यभाग बुडाला, अशी एक धारणा जनमानसात घट्टपणे रुजलेली आहे. येणारा रविवार म्हणजे २ नोव्हेंबर हा दिवस कन्या राशीच्या व्यक्तींसाठी खूशखबर घेऊन येत असून, शनीच्या साडेसातीतून कन्या राशीच्या व्यक्तींची मुक्तता होणार आहे. कन्या राशीची सुटका होत असताना, धनु राशीच्या व्यक्तींसाठी मात्र साडेसातीला प्रारंभ होणार आहे.
येत्या रविवारी म्हणजे २ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजून ५४ मिनिटांनी शनी वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. वृश्चिक राशीचा हा शनी वृश्चिक राशीस पहिला, तुळेस दुसरा, कन्येस तिसरा, सिंहेस चौथा, कर्केस पाचवा, मिथुन राशीस सहावा, वृषभसाठी सातवा, मेषसाठी आठवा, मीनसाठी नववा, कुंभ राशीसाठी दहावा, मकरसाठी अकरावा आणि धनु राशीसाठी बारावा याप्रमाणे पंचांगकर्त्यांनी सांगितला आहे. येत्या रविवारी कन्या राशीची साडेसाती संपुष्टात येणार आहे; परंतु तुला, वृश्चिक आणि धनु राशींना मात्र साडेसाती असणार आहे. त्यातही धनु राशीला साडेसाती सुरू होणार असून, तुला राशीचा शेवटचा अडीच वर्षांचा काळ शिल्लक आहे, तर वृश्चिक राशीचा पहिला अडीच वर्षांचा काळ संपून दुसऱ्या अडीचकीत शनी प्रवेश करत आहे. शनीच्या वृश्चिक राशीत प्रवेशामुळे मेष-कन्या-कुंभ राशीस चिंता, मिथुन-तुला-मकर राशीस शुभ, वृषभ-सिंह-धनु राशीस श्रीप्राप्ती, तर कर्क-वृश्चिक-मीन राशीस कष्ट राशीफल सांगितले आहे. शनीचा साडेसातीचा काळ कष्टदायक व खडतर मानला जातो. अनेकांना हा काळ भरभराटीचाही गेल्याची उदाहरणे ऐकायला मिळतात. कुणी साडेसातीचा फटका बसल्याने उद्ध्वस्त झाल्याची भावना व्यक्त करताना दिसून येतात; परंतु त्याला शास्त्रीय आधार नसल्याचे विज्ञानवादी ठामपणे सांगतात.