लाडका ‘विघ्नहर्ता’ घरोघरी विराजमान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:16 AM2021-09-11T04:16:39+5:302021-09-11T04:16:39+5:30
नाशिक : ताशाचा तडतड नाद, गुलालाची उधळण आणि सकाळच्या रिमझिम सरीतही ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात लाडक्या गणरायाची मूर्ती हाती घेताच ...
नाशिक : ताशाचा तडतड नाद, गुलालाची उधळण आणि सकाळच्या रिमझिम सरीतही ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात लाडक्या गणरायाची मूर्ती हाती घेताच कुटुंबीय आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने शहरातील प्रत्येक रस्ता दुमदुमून गेला होता. कोरोनाचे विघ्न दूर होऊ दे, अशीच मनोमन प्रार्थना करीत प्रत्येक गणेशभक्ताने लाडक्या गणरायाचे दणक्यात स्वागत केले. सर्व सार्वजनिक मंडळांकडून शासन निर्देशानुसार यंदा छोट्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतानाही जल्लोष कायम होता.
श्री गणरायाच्या स्वागतासाठी शहरात महिन्याच्या प्रारंभापासूनच सुरू असलेल्या तयारीच्या लगबगीनंतर शुक्रवारी पारंपरिक थाटात व मोठ्या भक्तिभावाने गणरायाचे आगमन झाले. विघ्नहर्ता आणि सकलांचे कल्याण करणाऱ्या श्री गणरायाच्या आगमनामुळे सकाळपासूनच प्रत्येक नागरिकात, चौकाचौकात जणू चैतन्य पसरले होते. गणपतीच्या जयजयकारात नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने गणपतीची मूर्ती घरी आणली. शहरातील व्दारका, डोंगरे वसतिगृह मैदान, सिडको, पंचवटी, कॉलेजरोड, सातपूर, नाशिकरोड भागातील मूर्ती दालनांबाहेर तसेच रस्त्यांवर प्रचंड ट्रॅफिक जाम झाले होते. त्यामुळे जमेल तिथे वाहने लावून नागरिकांनी पायीच मूर्ती खरेदीला प्राधान्य दिले. तसेच मूर्ती खरेदीपूर्वीच स्थापनेसाठी पाट, फुलांचे हार, पूजा साहित्य खरेदीसाठीदेखील नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे सर्व साहित्य खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या होत्या. अनेक कुटुंबांनी गणरायाला घरी नेताना मास्कचा नियम कटाक्षाने पाळल्याचे दिसून आले. मात्र, काही सार्वजनिक मंडळांतील कार्यकर्त्यांना जल्लोषाच्या नादात मास्कचा विसर पडल्याचे दिसून आले. काही मंडळांचे कार्यकर्ते भगवे फेटे बांधून तर काही मंडळांच्या उत्साही तरुणांनी ताशावर ठेका धरत दालनापासून गाडीपर्यंत मिरवणुका काढल्या.
इन्फो
चांदीच्या गणपतीची पाचपावली मिरवणूक
शतकोत्तर परंपरा असलेल्या रविवार कारंजावरील सिद्धिविनायक अर्थात चांदीच्या गणपतीची मिरवणूक यंदा मंडळाच्या कार्यालयापासून मंदिरापर्यंत अशी पाचपावली काढण्यात आली. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह मोजकेच भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. अभिनेता चिन्मय उद्गीरकर यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्राच्या अभिषेकासह पूजा केल्यानंतर उपस्थितांना प्रसादराचे वाटप करण्यात आले. भाविकांना मंदिरात येण्यास शासन निर्णयामुळे बंदी असली तरी भाविकांनी मंदिराबाहेर उभे राहून लाडक्या गणरायाचा जयघोष केला.
इन्फो
ताशाने भरून काढली ढोलची उणीव
ढोलपथकांना बंदी असल्याने बहुतांश मंडळांनी यंदा रस्त्यावरच उभे असणाऱ्या एक-दोन ताशावाल्यांकडून दालन ते वाहनापर्यंत मिरवणूक काढून नाचण्याची हौस भागवून घेतली. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ताशावादकांनाही भलतीच मागणी होती. काही मंडळांनी मात्र नियमानुसार शांतपणे छोटी गणेशमूर्ती घेऊन आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करणेच पसंत केले.