२० हजार रुपयांमध्ये लाखभर मते, नामसाधर्म्य असलेल्या बाबू भगरेंचा विक्रम
By संकेत शुक्ला | Published: July 5, 2024 04:37 PM2024-07-05T16:37:59+5:302024-07-05T16:39:10+5:30
निवडणुकीच्या खर्चाचा अंतिम ताळमेळ निवडणूक विभागाला सादर केल्यानंतर या बाबी उघड झाल्या आहेत.
नाशिक : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नामसाधर्म्याचा फायदा घेत लाखभर मते घेणाऱ्या दिंडोरी येथील बाबू सदू भगरे यांनी संपूर्ण निवडणुकीसाठी फक्त २० हजार रुपये खर्च केला आहे. खर्च सादर करण्याच्या शेवटच्या मुदतीत त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये हा खर्च दाखविण्यात आला आहे, तर नाशिक आणि दिंडोरी दोन्ही मतदारसंघांतील प्रत्येक एक उमेदवारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडणुकीच्या खर्चाचा अंतिम ताळमेळ निवडणूक विभागाला सादर केल्यानंतर या बाबी उघड झाल्या आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार राजाभाऊ वाजे यांना देणगी स्वरूपात मिळालेल्या रकमेपेक्षाही त्यांचा निवडणुकीचा खर्च कमी झाल्याचे त्यात दिसून येते. नाशिक लोकसभेत सर्वाधिक खर्च माजी खासदार हेमंत गोडसे यांनी (८६ लाख दोन हजार ११३) केला आहे. त्यांच्यासाठी पक्षाने ४५ लाखांचा खर्च केला आहे. राजाभाऊ वाजे यांना एकूण ८३ लाखांची देणगी मिळाली, त्यापैकी ८० लाख ८८ हजार रुपये निवडणुकीत त्यांनी खर्च केला आहे.
शांतिगिरी महाराजांनी २२ लाख दहा हजार रुपये खर्च केले. सिद्धेश्वरानंद सरस्वती यांनी १९ लाख पाच हजार रुपये खर्च झाल्याचे निवडणूक आयोगाला कळवले आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ‘बाबू भगरे पॅटर्न’ एक लाख ९ हजार मतांमुळे चांगलेच चर्चेत आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीची मते कमी झाली. परंतु, त्याचा निकालावर फारसा परिणाम झाला नाही. या मतदारसंघातील माजी मंत्री डॉ. भारती पवार यांनी ७५ लाख १४ हजार रुपये खर्च सादर केला आहे, तर खासदार भास्कर भगरे यांनी ६२ लाख ३२ हजार रुपये खर्च झाल्याचे निवडणूक आयोगाला कळवले आहे.
दोघांवर गुन्हे दाखल...
दिंडोरी मतदारसंघाच्या निवडणुकीत देणगी स्वीकारताना तसेच खर्च करताना रोखतेची मर्यादा न पाळल्याने वंचित बहुजन आघाडीच्या मालती ढोमसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर दुसरीकडे नाशिक मतदारसंघातील उमेदवार भाग्यश्री अडसूळ यांनी खर्चच सादर न केल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.