लसीकरणाचा ‘लाखा’चा टप्पा; सिन्नर अद्याप ‘हॉटस्पॉट’च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:18 AM2021-08-24T04:18:18+5:302021-08-24T04:18:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सिन्नर : तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा आकडा एक लाखाच्या पुढे सरकलेला असताना कोरोना रुग्णांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा आकडा एक लाखाच्या पुढे सरकलेला असताना कोरोना रुग्णांची संख्या शंभरीच्या आत येत नसल्याने प्रशासनाच्या दृष्टीने डोकेदुखी कायम आहे. जिल्ह्यातील सुमारे ३८ टक्के रुग्ण सिन्नर तालुक्यात असून, सिन्नरच्या ३३ गावांत कोरोनाचा मुक्काम कायम आहे. जिल्ह्यात सिन्नर तालुका अद्याप हॉटस्पॉट असल्याने भीतीयुक्त काळजी व्यक्त केली जात आहे.
सुमारे सव्वाचार लाख लोकसंख्या असलेल्या सिन्नर तालुक्यात आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. लसींची वाढती उपलब्धता, आरोग्य विभागाचे नियोजन, वाढवलेले लसीकरण केंद्र, तालुका आणि गाव पातळीवरील लोकप्रतिनिधींकडून लसीकरणासाठी झालेले प्रबोधन यामुळे तालुक्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या आकडेवारीने लाखाची संख्या पार केली आहे. सिन्नरकरांच्या दृष्टीने ही बाब समाधानकारक असली तरी सध्या ॲक्टिव्ह रुग्णसंख्या १७४ आहे. जिल्ह्यात सध्या ४६० ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यातील १७४ म्हणजे सुमारे ३८ टक्के रुग्ण सिन्नर तालुक्यातील आहेत. सिन्नर शहरासह ग्रामीण भागात रुग्णसंख्या अधिक आहे. दापूर, सोनारी या गावांसह पूर्व भागात रुग्णसंख्या जास्त असल्याचे दिसून येते. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार लोकसंख्येच्या प्रमाणात गेल्या ७ महिन्यांत तालुक्यातील ७ टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. २८ हजार ९५ नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत, तर ७२ हजार ३६५ नागरिकांना पहिला डोस मिळाला आहे. दोन्ही डोस मिळालेले ६.५८ टक्के नागरिक वैद्यकीयदृष्ट्या कोरोनापासून काहीसे सुरक्षित झाले आहेत, तर १७ टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे.
चौकट-
कोरोना नेमका सिन्नरलाच का वाढतोय?
जिल्ह्यातील इतर तालुक्यांची आकडेवारी पाहता सिन्नर तालुक्यात त्यांच्या मानाने कोरोना रुग्णांचे प्रमाण खूपच आहे. सिन्नर तालुक्यात कोरोना नेमका कोणत्या कारणाने वाढतोय याचा शोध घेणे गरजेचे आहे. नागरिकांकडून कोरोनाचे नियम व त्रिसूत्रीचे पालन होत नाही का? सार्वजनिक कार्यक्रमांना मोठी गर्दी होते आणि प्रशासनाकडून बघ्याची भूमिका घेतली जाते का, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहेत.
चौकट-
कोरोना वाढण्याची कारणे..
नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर सिन्नर तालुका आहे. नाशिक जिल्ह्याच्या मानाने अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहेत. तालुक्याच्या पूर्व भागातील गावांचा कोपरगाव, राहाता, शिर्डी व संगमनेर या लगतच्या गावांना व्यावसायिक व खरेदीसाठी जास्त संपर्क असल्याने पूर्व भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असावी. सिन्नर तालुक्यात संशयित रुग्णांची तातडीने टेस्ट (तपासणी) केली जाते. त्यामुळेही रुग्णसंख्या वाढत असावी.
चौकट-
औद्योगिकीकरणामुळे दळणवळण वाढते
सिन्नर तालुक्यात मुसळगाव व माळेगाव या दोन औद्योगिक वसाहती आहेत. त्यामुळे परराज्यातून ये-जा करणारे मजूर व ट्रान्सपोर्ट जास्त आहे. बाहेर राज्यातून येणाऱ्या ट्रक व चालक यांचेही प्रमाण जास्त आहेत. अनेक कारखान्यांत शेकडो रुग्ण कामावर असतात. ग्रामीण भागातून एमआयडीसीत येणाऱ्या कामगारांचे प्रमाण जास्त आहे. यामुळेही संसर्ग वाढण्याची भीती असते.
चौकट-
सिन्नर तालुक्यात रुग्णांना लक्षणे दिसल्यानंतर त्यांची तातडीने तपासणी केली जाते. घरोघर जाऊन सर्व्हे केला जातो. आरोग्य विभाग प्रत्येक बारीक-सारीक बाबींकडे लक्ष ठेवून असतो. वेळीच रुग्ण ट्रेस होऊन त्यावर इलाज केले जावेत म्हणजे संसर्ग वाढत नाही, याकडे कल आहे. लगतच्या अहमदनगर जिल्ह्यात नागरिकांचा संपर्क जास्त आहे. लोकांनी अजूनही त्रिसूत्रीचा वापर करावा. लसीकरणात सिन्नरने एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे.
-डॉ. मोहन बच्छाव, तालुका वैद्यकीय अधिकारी, सिन्नर.