लाखो भीमसैनिक मुक्तिभूमीवर नतमस्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:45 AM2018-10-14T00:45:40+5:302018-10-14T00:46:14+5:30
ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या ८३ व्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील मुक्तिभूमी येथे लाखो भीमसैनिकांनी हजेरी लावीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन केले.
येवला : ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या ८३ व्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील मुक्तिभूमी येथे लाखो भीमसैनिकांनी हजेरी लावीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन केले.
८३ वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला येथे मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते, मी हिंदू म्हणून जन्माला आलो; पण हिंदू म्हणून मरणार नाही अशी ऐतिहासिक धर्मांतराची घोषणा केली होती. या घोषणेच्या ८३ व्या वर्धापनदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करीत दलित समाजातर्फे शनिवारी (दि. १३) मुक्तिभूमी येथे विविध कार्यक्रम आयोजित केले. राज्यभरातून लाखो समाजबांधवांनी येथे हजेरी लावली.
सकाळपासूनच येवला-विंचूर चौफुलीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून लाखो दलित बांधव मुक्तिभूमीवर नतमस्तक झाले. आमदार छगन भुजबळ, भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्ष मीराताई आंबेडकर, आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, शिवसेना नेते संभाजी पवार, राष्ट्रवादीचे अॅड. माणिकराव शिंदे, उषाताई शिंदे, तहसीलदार रोहिदास वारु ळे, बाळासाहेब लोखंडे, रिपाइंचे गुड्डू जावळे, सुभाष गांगुर्डे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
ज्या मैदानावर बाबासाहेबांनी धर्मातंराची घोषणा केली त्या मुक्तिभूमी येथील मैदानावर ध्वजारोहण व क्रांतिस्तंभाला आंबेडकरी जनतेसह अनेकांनी पुष्पहार अर्पण केला. गावा गावांतील कार्यकर्त्यांनी अन्नदानासाठी परिसरात राहुट्या उभ्या केल्या होत्या.
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली. महिला, युवकांचा मोठ्या प्रमाणात या रॅलीत सहभाग दिसून आला.
अनेक ठिकाणांहून बसेस, मोटारसायकल, ट्रॅक्टर, टेम्पो, रिक्षा व पदयात्रेने भीमसैनिक येथे येत होते. डीजेच्या तालावर भीमगीतांचा गजर करीत कित्येक खेडोपाड्यांतून आलेला जनसागर रस्त्याच्या दुतर्फा दिसून येत होता. भल्या सकाळी लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानच्या वतीने मुक्तिपहाट हा आंबेडकरी शाहिरी जलशाचा कार्यक्र म सकाळी ६ ते १० पर्यंत पार पडला. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सकाळी मुक्तिभूमी ते विंचूर चौफुलीपर्यंत रॅली काढण्यात आली.