कमी दराच्या आमिषाने दोन लाखांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 01:46 AM2019-07-15T01:46:29+5:302019-07-15T01:48:44+5:30
कमी दरात किराणा पुरविण्याचे आश्वासन देत नातवाचे आॅपरेशनचे भावनिक कारण सांगून माधुरी एखंडे (४०, रा. शांतीनगर, मखमलाबाद) यांच्या ब्युटि पार्लरमध्ये येऊन चौथे दाम्पत्याने एखंडे यांच्यासह अन्य महिलांना सुमारे दोन लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयितांविरुद्ध महिलांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक : कमी दरात किराणा पुरविण्याचे आश्वासन देत नातवाचे आॅपरेशनचे भावनिक कारण सांगून माधुरी एखंडे (४०, रा. शांतीनगर, मखमलाबाद) यांच्या ब्युटि पार्लरमध्ये येऊन चौथे दाम्पत्याने एखंडे यांच्यासह अन्य महिलांना सुमारे दोन लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयितांविरुद्ध महिलांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, १ जानेवारी २०१८ ते १३ जुलै २०१९ या कालावधीमध्ये संशयित सोनम अनिल चौथे, अनिल रामचंद्र चौथे, प्रेम अनिल चौथे (रा. तळेनगर, रामवाडी) यांनी एखंडे यांच्यासह अन्य महिलांची भेट घेतली. त्यांना कमी दरात किराणा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत अन्नपूर्णा महिला को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही संस्था स्वत:ची असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. तसेच त्यांचे ब्युटि पार्लर गाठून नातवाच्या शस्त्रक्रियेचे भावनिक कारण पुढे करून संशयित चौथे दाम्पत्याने एखंडे यांच्यासह अन्य महिलांकडून पैसे उकळून सुमारे दोन लाख रुपयांची फसवणूक केली. किराणा माल विक्री करण्याच्या उद्देशाने या भामट्या जोडीने महिलांकडून पैसे उकळल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
एखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास गुन्हे शोध पथकाचे निरीक्षक साखरे करीत आहेत.
आर्थिक फसवणुकीचे विविध फंडे समोर येत असून, शहरात मागील काही दिवसांपासून सोशल मीडिया ते स्मार्ट डिजिटल बॅँकिंगप्रणालीचा गैरवापर करत अनेकांना चुना लावल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यानंतर किराणा माल कमी दरात पोहचविण्याचे सांगून तब्बल दोन लाख रुपयांना गंडा घालण्याचा नवीनच प्रकार पंचवटीत घडला.