लाखो भाविक महामृत्युंजय भगवान त्र्यंबकराजाच्या चरणी लीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 09:40 PM2018-08-13T21:40:39+5:302018-08-13T21:41:56+5:30
श्रावणसरी अंगावर झेलत पहिल्या श्रावणी सोमवारी लाखो भाविक महामृत्युंजय भगवान त्र्यंबकराजाच्या चरणी लीन झाले. त्र्यंबकराजाच्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून गेला होता.
त्र्यंबकेश्वर : श्रावणसरी अंगावर झेलत पहिल्या श्रावणी सोमवारी लाखो भाविक महामृत्युंजय भगवान त्र्यंबकराजाच्या चरणी लीन झाले. त्र्यंबकराजाच्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून गेला होता. श्रावणातील पहिला सोमवार असल्याने रात्रीपासूनच भाविकांनी प्रदक्षिणेला जाण्यासाठी शहरात गर्दी केली होती. त्र्यंबकेश्वर मंदिर, कुशावर्त तीर्थ आदींसह काही भाविक ब्रह्मगिरीवरही जात होते. कुशावर्तावर भाविकांची गर्दी होती. भाविकांची गर्दी लक्षात घेता दोन दिवसांत कुशावर्तचे तीर्थ उपसून स्वच्छ करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दर्शनबारी बाहेर भर पावसात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. देणगी दर्शनासाठीदेखील भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला गेलेली संत निवृत्तिनाथांची पालखी सोमवारी शहरात दाखल झाली. निवृत्तिनाथ व त्र्यंबकराजाच्या भेटीचा सोहळा रंगला.
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारपासूनज पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. डीवायएसपी सचिन गोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमाकांत सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परिवहन महामंडळातर्फे हवी तेव्हा बस मिनिटाला सोडली जात होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली नाही. उपजिल्हा रु ग्णालयात पुरेशा औषधसाठ्यासह वैद्यकीय अधिकारी तत्पर होते. पालिकेने स्वच्छतेची काळजी घेऊन साफसफाई ठेवली होती. नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर , उपनगराध्यक्ष स्वप्नील शेलार, गटनेते समीर पाटणकर यांच्यासह मुख्याधिकारी डॉ. चेतना मानुरे केरु रे, आरोग्य सभापती विष्णू दोबाडे गर्दीवर लक्ष ठेवून होते.