सव्वा लाखांचे दागिणे लंपास; लग्नसराईच्या हंगामात हात साफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 02:23 PM2019-04-20T14:23:43+5:302019-04-20T14:25:23+5:30
पाटीलनगरनंतर राणाप्रताप चौकात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १ लाख ३० हजार रूपयांचे दागिणे लांबविल्याचे उघडकीस आले आहे.
नाशिक : शाळांना असलेली उन्हाळी सुटी, लग्नसराईचा हंगाम यामुळे नागरिक बाहेरगावी जात असल्यामुळे बंद घरांना ‘लक्ष्य’ करण्याच्या घटना शहर व परिसरात सातत्याने सुरू असून अंबड पोलीस ठाणे हद्दीत सिडको परिसरात सातत्याने घरफोडीच्या घटना दिवसाआड घडत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. पाटीलनगरनंतर राणाप्रताप चौकात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १ लाख ३० हजार रूपयांचे दागिणे लांबविल्याचे उघडकीस आले आहे.
चोरट्यांसाठी लग्नसराई, सुटीचा हंगाम सुगीचा काळ ठरत असून भरदीवसा तसेच रात्री बंद घरांचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करत रोकड, मौल्यवान वस्तू, दागिण्यांवर चोरटे हात साफ करत आहेत. दोन दिवसांपुर्वी सिडकोमधील पाटीलनगर भागात अशाच पध्दतीने घरफोडी करत चोरट्यांनी ७० हजारांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेचा तपास सुरू होत नाही, तोच दुसरी घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राणाप्रताप चौकात घडली. येथील दत्तात्रय त्र्यंबक पाटील (४३) यांचे बंद घराचे कुलूप दोघा अज्ञात संशयितांनी शुक्रवारी (दि.१९) रात्री पावणेदोन वाजेच्या सुमारास तोडले. घरातील ३ ग्रॅम वजनाची ५० हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत, मणी, साडेतीन ग्रॅमचे सोन्याचे ६० हजार रूपये किंमतीचे कानातले वेल, आठ हजार रूपये किंमतीची ५ग्रॅमची सोन्याची अंगठी, २५ग्रॅमचा चांदीचा तोरड्याचा जोड, १२ हजार ५०० रूपयांची रोकड असा सुमारे १ लाख ३१ हजार २०० रूपयांचा ऐवज लूटून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दा्नखल करण्यात आला आहे.