घरफोड्यांमध्ये लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:13 AM2018-07-30T00:13:04+5:302018-07-30T00:13:20+5:30

मोबाइल खेचण्याबरोबरच शहरात घरफोडीचेही सत्र सुरू झाले आहे़ औरंगाबादरोड परिसरात चोरट्यांनी भरदिवसा एकाच इमारतीत दोन ठिकाणी तर सातपूरला एका ठिकाणी अशा तीन घरफोड्या करून सुमारे एक लाखाचा ऐवज चोरून नेला़

Lakhs of Lakhas | घरफोड्यांमध्ये लाखाचा ऐवज लंपास

घरफोड्यांमध्ये लाखाचा ऐवज लंपास

Next

नाशिक : मोबाइल खेचण्याबरोबरच शहरात घरफोडीचेही सत्र सुरू झाले आहे़ औरंगाबादरोड परिसरात चोरट्यांनी भरदिवसा एकाच इमारतीत दोन ठिकाणी तर सातपूरला एका ठिकाणी अशा तीन घरफोड्या करून सुमारे एक लाखाचा ऐवज चोरून नेला़  इंद्रायनी लॉन्सजवळील रहिवासी सागर गावले व त्यांचे शेजारी प्रवीण कानडे हे शुक्रवारी (दि़२७) सकाळी कामानिमित्त बाहेर गेले होते़ या कालावधीत त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ७४ हजार ८०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकडसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  घरफोडीची तिसरी घटना सातपूर परिसरातील वनविहार कॉलनीत भरदिवसा घडली़ श्रद्धा अपार्टमेंटमधील रहिवासी संतोष पठारे हे शुक्रवारी दुपारी कामानिमित्त कुटुंबीयांसमवेत बाहेर गेले होते़ या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली सहा हजाराची रोकड, एलईडी टीव्ही आणि गॅस सिलिंडर असा सुमारे २१ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई नाक्यावर मोबाइल हिसकावला
मोबाइलवर बोलत जाणाऱ्या गोविंदनगर येथील धिरेंद्र राधेश्याम दुबे (रा. मोटकरी प्लाझा) यांचा दहा हजार रुपये किमतीचा मोबाइल दुचाकीवरील चोरट्यांनी खेचून नेल्याची घटना मुंबई नाक्यावर घडली़ या प्रकरणी पोलिसांत जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
भाडेकरूची माहिती न दिल्याने घरमालकावर गुन्हा
फ्लॅट परस्पर भाडेतत्त्वावर देऊन त्याबाबतची माहिती पोलीस ठाण्यास न कळविणारे मुंबईतील भेंडी बाजार येथील हुसेन एफ. पीनवाला यांच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरमालक पीनवाला यांनी टाकळी रोडवरील श्रीराम मंगल अपार्टमेंटमधील सात नंबरचा फ्लॅट गत चार वर्षांपासून एका भाडेकरूला भाडेतत्त्वावर दिला होता़
तिघांनी मोबाइल चोरला
मखमलाबाद रोडवरील घाटोळ मळ्यातील रहिवासी सोपान लक्ष्मण गिते यांचा सहा हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाइल संशयित वैभव संजय गांगुर्डे (रा. गणपती मंदिरासमोर, आकाश पेट्रोलपंपाजवळ, मेरीरोड, पंचवटी, नाशिक), सोन्या खंडीझोड (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही व विकी (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) या तिघांनी नवीन भाजीबाजार येथून चोरून नेला़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खुटवडनगरमधील
युवकाची आत्महत्या
खुटवडनगरमधील गणपती मंदिराजवळील रहिवासी गौतम जयप्रकाश सिंग (२२) या युवकाने शुक्रवारी (दि़२७) सायंकाळी सातपूर आयटीआय आवारात उंदीर मारण्याचे विषारी औषध सेवन केले होते. ही बाब लक्षात येताच त्यांच्या वडिलांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राका कॉलनीतून दुचाकीची चोरी
पंडित कॉलनीतील जामा सदन येथील रहिवासी धनराज कानोडे यांची हिरोहोंडा स्प्लेंडर प्लस दुचाकी (एमएच १७, एके ६५९६) चोरट्यांनी गंगापूर रोडवरील राका कॉलनी
येथून चोरून नेली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
युवकास मारहाण
धक्का लागल्याच्या कारणातून तिघा संशयितांनी पादचारी युवकास मारहाण केल्याची घटना अंबड औद्योगिक वसाहतीतील दत्तनगरमध्ये शनिवारी (दि़२८) दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी सिद्धार्थ दादाजी उशिरे (रा. चुंचाळे घरकूल योजना, चुंचाळे शिवार, अंबड) यांच्या फिर्यादीनुसार अंबड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेलरोडला तरुणाची आत्महत्या
तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि़ २८) रात्रीच्या सुमारास जेलरोड येथील पवारवाडीत घडली़ नीलेश रमेश चव्हाण (२२, रा. शक्तीनगर, पवारवाडी, जेलरोड) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे़ त्याने राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास घेतला़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

Web Title: Lakhs of Lakhas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.