घरफोडीत सव्वापाच लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 01:04 AM2019-06-11T01:04:58+5:302019-06-11T01:06:03+5:30
जेलरोड जुना सायखेडारोड रामेश्वरनगर येथील बंद बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्याने सव्वापाच लाख रुपये रोख व दहा तोळ्याचे सोन्याचे दागिने, असा सुमारे सव्वासात लाखांचा ऐवज चोरून नेला.
नाशिकरोड : जेलरोड जुना सायखेडारोड रामेश्वरनगर येथील बंद बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्याने सव्वापाच लाख रुपये रोख व दहा तोळ्याचे सोन्याचे दागिने, असा सुमारे सव्वासात लाखांचा ऐवज चोरून नेला. वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे.
जेलरोड जुना सायखेडारोड रामेश्वरनगरमधील प्रतीक बंगल्यात बांधकाम व्यावसायिक प्रेमचंद निंबाजी पाटील हे आपल्या कुटुंबीयासह राहतात. शनिवार (८ जून) मेव्हण्याचा हळदीचा कार्यक्रम असल्याने ते सकाळी ११ वाजता बंगल्याच्या दरवाजाला कडीकोंडा लावून सहकुटुंब कोपरगाव कोळपेवाडी येथे गेले. पाटील यांनी रात्री साइटवरील वॉचमन रघुनाथ गवई यास बंगल्यावर झोपण्यास सांगितले होते. मात्र गवई हा रात्री बंगल्यावर झोपण्यास गेला नाही. पाटील हे बंगल्याला कुलूप लावून गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील पाच लाख ३० हजार रुपये रोख तसेच चार सोन्याच्या बांगड्या, तीन अंगठ्या, साखळी, मिनी गंठन असे १ लाख ९४ हजार रुपये किमतीचे दहा तोळ्यांचे दागिने, असा एकूण सात लाख २४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. वॉचमन गवई रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास बंगल्यावर आले असता त्यांना मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तुटलेला व पाठीमागील दरवाजा उघडा असलेला आढळून आले. गवई यांनी याबाबत लागलीच फोनवरून मालक पाटील यांना चोरी झाल्याबाबतची माहिती दिली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोऱ्यांचे प्रमाण वाढले
नाशिकरोड-उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत व ग्रामीण भागामध्ये घरफोड्या, चोºया, दुचाकीचोरी यांचे प्रमाण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. चोºया रोखण्यात व झालेल्या चोऱ्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश येत नसल्याने सर्वसामान्य घाबरून गेले आहे.