लाखो मराठा नाशिकहून मुंबईकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 12:09 AM2017-08-09T00:09:32+5:302017-08-09T00:12:13+5:30
कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर गेल्या वर्षी संपूर्ण राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून मराठा क्रांती मूक मोर्चांच्या माध्यमातून रस्त्यावर उतरलेला सकल मराठा समाज आज राज्यस्तरीय मराठा क्रांती मूक मोर्चाच्या माध्यमातून मुंबईत धडकणार आहे.
नाशिक : कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर गेल्या वर्षी संपूर्ण राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून मराठा क्रांती मूक मोर्चांच्या माध्यमातून रस्त्यावर उतरलेला सकल मराठा समाज आज राज्यस्तरीय मराठा क्रांती मूक मोर्चाच्या माध्यमातून मुंबईत धडकणार आहे. या मोर्चासाठी नाशिकमधून लाखो मराठा मोर्चेकरी मंगळवारी रात्रीपर्यंत मुंबईकडे रवाना झाले असून, हा ओघ बुधवारी (दि.९) सकाळी मोर्चा सुरू होईपर्यंत सुरू राहण्याची शक्यता असून, मुंबईकडे जाणाºया मुंबई-आग्रा महामार्गावर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
आझाद मैदानात धडकणाºया या मोर्चाचे नियोजन पूर्ण झाल्याचे समन्वयक समितीने स्पष्ट केले असून, नियोजन समिती पथकांसह समन्वय समितीचे कार्यकर्तेही मंगळवारी सकाळीच मुंबईकडे रवाना झाले आहे. वीर जिजामाता उद्यानातून मोर्चाला सुरुवात होऊन आझाद मैदानापर्यंत पोहोचणाºया मोर्चात सर्व मोर्चेकरी सहभागी होणार असून, मुंबईत क्रांतिदिनी निघणारा मराठा क्रांती मोर्चा ‘न भूतो न भविष्यती’, असा निघणार असल्याचा दावा नाशिकच्या समन्वय समितीने केला आहे. मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाही राज्यभरात झालेल्या ५७ मूक मोर्चांप्रमाणेच मूक स्वरूपाचा असून, त्याप्रमाणेच या ५८व्या मोर्चाची आचारसंहिता असेल. मराठा क्रांती मोर्चा बुधवारी सकाळी ११ वाजता वीर जिजामाता उद्यानापासून सुरू होईल. हा मोर्चा अण्णासाहेब पाटील पूल, खडापारसी, इस्माईल मर्चंट चौक, जे. जे. उड्डाणपूलमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ओलांडून आझाद मैदानात पोहोचणार आहे. याठिकाणी समाजातील काही निवडक कन्या मोर्चाला संबोधित करणार आहे. यात राज्यभारतील विविध जिल्ह्यांमध्ये निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या व्यासपीठावरून समाजाची भूमिका मांडणाºया समाजकन्यांचा समावेश असणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून एका समाजकन्येची निवड करण्यात आली असून, केवळ नाशिकमधून दोन मुलींची निवड करण्यात आली आहे. या समाजकन्या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आझाद मैदानावरील व्यासपीठावरून कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडणार आहेत. तसेच मराठा समाजाची भूमिकाही मांडणार आहेत.