वडाळागावात लाखो लिटर्स पाण्याची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 01:08 AM2019-06-08T01:08:58+5:302019-06-08T01:09:22+5:30
वडाळागाव परिसरातील अनेक भागांत अनधिकृत नळजोडणीद्वारे पाणीचोरीचे प्रकार अद्यापही सुरूच असून, गेल्या काही दिवसांत महापालिकेच्या डोळ्यात धूळफेक करून बेकायदेशीर नळजोडणीची संख्या वाढली असल्याची चर्चा आहे.
इंदिरानगर : वडाळागाव परिसरातील अनेक भागांत अनधिकृत नळजोडणीद्वारे पाणीचोरीचे प्रकार अद्यापही सुरूच असून, गेल्या काही दिवसांत महापालिकेच्या डोळ्यात धूळफेक करून बेकायदेशीर नळजोडणीची संख्या वाढली असल्याची चर्चा आहे.
वडाळागावातील अनेक भागांत अनधिकृत नळजोडणीची जणू स्पर्धाच लागली आहे. यामुळे दररोज हजारो लिटर पाण्याची चोरी होत आहे. शहरात दररोज सुमारे साडेचार लाख लिटर पाणीगळती होते. त्यापैकी सुमारे दोन लाख लिटर्स पाण्याची गळती एकट्या वडाळागाव परिसरात होत आहे. अनधिकृत नळजोडणीच्या माध्यमातून पाणी उपलब्ध होत असल्याने अधिकृत जोडणीची संख्या कमी असल्याने महापालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळू शकत नाही. यामुळे पालिकेचेदेखील नुकसान होत आहे.
गेल्या अनेक वर्षांत येथील ठराविक भागात पाण्याच्या चोरीचे प्रकार वाढीस लागले आहे. महापालिका यंत्रणेलादेखील पाणीचोरीची ठिकाणी ज्ञात आहेत. परंतु त्यांच्याकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याने पाणीचोरीचे सत्र सुरूच आहे. वडाळागाव परिसरात अनधिकृत नळजोडणीमुळे लाखो रु पयांच्या पाणीपट्टी माध्यमातून महसूल बुडत आहे. तरीही पाणीपुरवठा विभागाला जाग येत नसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पाणीपुरवठा विभागाला केव्हा जाग येणार? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
वडाळागाव परिसरातील काही भागांत सातत्याने वाढ होत आहे. मोलमजुरी करणारे तसेच हातगाडीवर व्यवसाय करणारे अनेक लोक या भागात राहातात. बहुतेक नागरिकांनी गुंठेवारी पद्धतीने नोटरीद्वारे जमीन विकत घेतली आहे. येथील मेहबूबनगरसह परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी जलवाहिनीतून नळजोडणी अनधिकृतपणे केली आहे.
अलीकडेच सुमारे अनधिकृत दोन हजार जोडणी परिसरात असल्याचे निदर्शनात आले होते ही घटना ताजी असतानाच मदिनानगर पाठीमागील परिसरात सुमारे चाळीस नागरिकांनी पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीतून अनधिकृतपणे नळजोडणी करून घेतली असल्याचे समोर आले. त्यामुळे दररोज हजारो लिटर पाण्याची चोरी होत असताना पाणीपुरवठा विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याने संताप व्यक्त केला आहे.
अनधिकृतपणे नळजोडणीमुळे पाणीपुरवठा विभागाचे पाणीपट्टीद्वारे मिळणारा महसूलदेखील बुडत आहे. शिवाय इंदिनरानगर परिसरात सातत्याने सातत्याने कृत्रिम पाणीटंचाईदेखील निर्माण होत आहे.
अनधिकृत नळजोडणीचे काय?
शहरात अधिकृत नळजोडणी असलेल्या ग्राहकांकडून महापालिका पाणीपट्टी वसूल करते तर अनेकांना नोटिसा देऊन त्यांना भरणा करण्यास भाग पाडले जाते, बंद मीटरप्रकरणी नोटीस देऊन दंडही आकारला जातो तर दुसरीकडे अनधिकृत नळजोडणी माहिती असूनही महापालिका त्यांच्यावर मात्र काहीच कारवाई करीत नसल्याचे हा कसला न्याय? असा प्रश्न ग्राहकांकडून विचारला जात आहे.