काथरगाव येथे कांदा चाळीला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 10:45 PM2022-05-16T22:45:32+5:302022-05-16T22:46:38+5:30
निफाड : तालुक्यातील काथरगाव येथील वाघ वस्तीवरील साठवलेल्या कांदा चाळीला आग लागून २० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे.
निफाड : तालुक्यातील काथरगाव येथील वाघ वस्तीवरील साठवलेल्या कांदा चाळीला आग लागून २० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, काथरगावचे माजी सरपंच राजाराम वाघ, काशिनाथ वाघ, डॉ. किरण वाघ आणि कुटुंबीय हे नातेवाइकांच्या लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. रविवारी (दि.१५) दुपारी दीडच्या दरम्यान वाघ यांच्या कांदा चाळीला आग लागल्याने कांदा चाळ, कांदा चाळीतील साठवलेला कांदा, खतांच्या गोण्या व दोन मोटारसायकली या आगीत जळून खाक झाल्या.
या कांदा चाळीत नवीनच काढलेले २५ ट्रॅक्टर उन्हाळ कांदे साठवलेले होते. ही आग लागल्याचे दिसताच आजूबाजूच्या शेतवस्तीतील लोकांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत कांदा चाळीसह २५ ट्रॅक्टर साठवलेले कांदे, रासायनिक खतांच्या गोण्या, २ मोटारसायकल, कृषीपंपाचे स्टार्टर, केबल वायर आदी आगीत जळून खाक झाले.
या आगीत तिघा वाघ कुटुंबीयांचे अंदाजे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. कांदा चाळीपासून राजाराम वाघ, काशिनाथ वाघ, डॉ. किरण वाघ यांची घरे १५ ते २० फुटांपर्यंत होती. मात्र, सुदैवाने या आगीची झळ या घरांना बसली नाही. या तिघा वाघ कुटुंबीयांनी कष्टाने पिकवलेला कांदा, कांद्याची चाळ, दोन मोटारसायकल व इतर शेतीउपयोगी साहित्य असे एकूण २० लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तलाठी खंडागळे यांनी घटनेचा पंचनामा केला असून आगीचे कारण समजू शकलेले नाही. निफाड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.