लाख काय, दहा हजारही देण्यास असमर्थ
By admin | Published: June 16, 2017 12:07 AM2017-06-16T00:07:33+5:302017-06-16T00:07:53+5:30
लाख काय, दहा हजारही देण्यास असमर्थ
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शासनाने खरीप पीककर्जासाठी तत्काळ कर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश बॅँकांना दिलेले असले आणि तातडीची मदत म्हणून दहा हजारांची खरिपासाठी मदत जाहीर केलेली असली तरी यातील एक रुपयाही शेतकऱ्यांना देण्यासाठी नाही, असे सांगत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने पीककर्ज वाटपासाठी ‘हात’ वर केले आहे.
दरम्यान, शासनाने सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला असला तरी कर्जमाफीसाठी टाकलेल्या नियम-निकषात जिल्ह्णातील सुमारे ८० टक्के शेतकरी वंचित राहण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने शासनाला लेखी स्वरूपात पत्र पाठवून खरिपासाठी पीककर्ज वाटपाला अनुदान नसल्याने शेतकऱ्यांना कर्जवाटप करता येणार नसल्याचे कळविले आहे. तसेच शासनाने खरिपासाठी तातडीची जाहीर केलेली दहा हजारांची मदतही देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे क्लिअरिंग बंद असून, सुमारे अडीच हजार कोटींची पीककर्ज वसुली थकलेली असल्याने जिल्हा बॅँकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे खरिपासाठी लाखाचे सोडा, दहा हजाराचे पीककर्ज वाटपासाठी निधी नसल्याचे लेखी स्वरूपात कळविले आहे. तसेच राज्य शिखर बॅँकेने जिल्हा बॅँकेच्या असलेल्या सुमारे दोनशे कोटींच्या ठेवी दिल्या तरी थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्यांना कर्जवाटप करता येणार असल्याचे कळविले आहे. त्यामुळे तूर्तास जिल्ह्णातील शेतकऱ्यांना व जिल्हा बॅँकेच्या शेतकरी सभासदांना खरीप कर्जासाठी शासनाकडून जिल्हा बॅँकेला अनुदान उपलब्ध झाले तरच पीककर्ज मिळण्याची आशा आहे.