शहरातील बाजारात अवतरली ‘लक्ष्मी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 11:36 PM2019-10-27T23:36:00+5:302019-10-28T00:03:23+5:30
ऐन दिवाळीच्या काळातच शहरात पावसाने लावलेली हजेरी व त्यामुळे ओस पडलेल्या बाजारपेठेत रविवारी पावसाने उघडीप दिल्याने बाजारात नवचैत्यन्य निर्माण झाले होते. बाजारात दाखल झालेल्या विविध वस्तु, कपडे, रेडीमेड फराळ, मिठाई, फटाके खरेदीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ग्राहकांची मोठी झुंबड बघायला मिळाली.
नाशिक : ऐन दिवाळीच्या काळातच शहरात पावसाने लावलेली हजेरी व त्यामुळे ओस पडलेल्या बाजारपेठेत रविवारी पावसाने उघडीप दिल्याने बाजारात नवचैत्यन्य निर्माण झाले होते. बाजारात दाखल झालेल्या विविध वस्तु, कपडे, रेडीमेड फराळ, मिठाई, फटाके खरेदीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ग्राहकांची मोठी झुंबड बघायला मिळाली. त्यामुळे शांत पडलेल्या बाजारपेठात लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच ‘लक्ष्मी’ अवतरल्याचे चित्र दिसत होते.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात विविध प्रकारचे साहित्य दाखल झाले होते, मात्र शहरात काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विक्रेत्यांसह ग्राहकांचा मोठा हिरमोड झाला होता. बाजारपेठेत हवी तशी गर्दी व खरेदी होत नसल्याने विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. दिवाळीसाठी विविध वस्तू बाजारांत येऊन सुद्धा पावसामुळे ग्राहकांनी काही प्रमाणात पाठ फिरविल्याचे दिसत होते. त्यामुळे पाऊस केव्हा उघडीप देईल याच प्रतीक्षेत सर्व जण होते. मात्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पावसाने उघडीप दिल्याने बाजारात एकप्रकारचे नवचैतन्य निर्माण झाले होते.
शहरातील मेनरोड, शालिमार, रविवार कारंजा, अशोकस्तंभ, कॉलेजरोड, गंगापूररोड, त्रिमूर्ती चौक, नाशिकरोड तसेच सर्वच भागांतील मार्केटमध्ये रविवारी मोठी गर्दी बघायला मिळाली. ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी विक्रेत्यांनी दिलेल्या आॅफर्स, मॉलमध्या बॅँडतर्फे दिलेली सूट, फर्निचर खरेदी, तसेच कपडे, वाहने, इलेट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीने यादिवशी बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. यामुळे विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण बघायला मिळाले.
कपड्यांच्या खरेदीत लक्षणीय वाढ
दिवाळी म्हटल की नवीन कपडे खरेदी ही हमखास होणारच. मात्र पावसामुळे खरेदीच्या मंदावलेल्या उत्साहाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झळाळी मिळाली. शहरातील सगळ्याच बाजारपेठांसह मॉल्समध्येही कपडे खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी बघायला मिळाली. यामुळे कपड्यांच्या मार्केटमध्ये मोठी उलाढाल झाली.
मिठाई, गिफ्टला पसंती
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फराळ, मिठाई, गिफ्ट्सना या दिवसांत मोठी मागणी असती. यावर्षी महिलांनी रेडिमेड फराळाला मोठी पसंती दिली आहे. वेळेच्या अभावामुळे महिलांचा याकडे मोठा कल दिसून आला. तसेच दिवाळीची भेट देण्यासाठी आक र्षक मिठाई व गिफ्ट्सच्या बॉक्सच्या विक्रीतही यादिवशी मोठी वाढ झाली. त्यामुळे शहरातील सर्वच मिठाई दुकानांवर ग्राहकांची झुंबड बघायला मिळाली.
वाहनबाजारात तेजी
प्रत्येक सणाला वाहन खरेदीला उत्साह वाढतो. त्यात दिवाळी म्हणजे सणांचा राजा.. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरातील सर्वच वाहन शो रुममध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी बघायला मिळाली. तसेच अनेकांनी आपले नवीन वाहन काही दिवस आधीच बुक करून ठेवले होते. तसेच वाहनांच्या अॅडव्हॉन्स बुकिंगमुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अनेकांना आपले आवडते वाहन मिळाले नाही.