भल्या पहाटे आपल्याच कारखान्यात आला ललित; नाशकात तीन तास मुंबई पोलिसांचा तपास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 06:06 AM2023-10-23T06:06:32+5:302023-10-23T06:07:21+5:30
एखाद्या टुरिस्ट कारसारख्या चकचकीत खासगी कारमधून ड्रग्ज माफिया संशयित ललित पाटीलची तीन तासांची नाशिक ‘व्हिजिट’ घडवून आणली गेली.
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : एखाद्या टुरिस्ट कारसारख्या चकचकीत खासगी कारमधून ड्रग्ज माफिया संशयित ललित पाटीलची रविवारी तीन तासांची नाशिक ‘व्हिजिट’ घडवून आणली गेली. मुंबई पोलिस रविवारी पहाटे त्याला एका कारमधून नाशिकला घेऊन आले. तीन तास नाशिकमध्ये त्याला घेऊन तपास करत शिंदेगावातील ‘त्या’ ड्रग्जच्या कारखान्यात घेऊन जात तेथून बारकावे शोधून मुंबईच्या दिशेने सकाळीच रवाना झाले. याबाबत पोलिसांनी कमालीची गोपनीयता बाळगली होती.
ललित पाटील हा मूळ नाशिकचा असून, त्याने शिंदेगावात ड्रग्जची फॅक्टरी चालविली होती. ही फॅक्टरी मुंबईच्या साकी नाका पोलिसांनी पंधरवड्यापूर्वी उद्ध्वस्त केली होती. त्याचा भाऊ फॅक्टरी चालवत होता. त्याला आणि फॉर्म्युला पुरविणाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
‘त्या’ दहा किलो सोन्याचा शोध सुरू
नाशिक पोलिसांनी संशयित अर्चना निकम या महिलेला ताब्यात घेतले होते. तिची कसून चौकशी केली असता, तिच्याकडून ललितचा भाऊ भूषण याने दिलेली ७ किलो चांदी हस्तगत केली आहे. ललितने खरेदी केलेल्या आठ-दहा किलो सोन्याचा शोध घेतला जात आहे. यापूर्वी पुणे पोलिसांनी तीन किलो सोने जप्त केलेले आहे.
आज कोर्टात नेणार
ललित पाटील याला उद्या, सोमवारी कोर्टात हजर केले जाणार आहे. चार दिवसांपूर्वी त्याला बंगळुरूमधून अटक करण्यात आल्यानंतर एम. डी. कारखाना प्रकरणात त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्यानुसार तपास अधिकारी त्याच्या अंमली पदार्थांच्या व्यवसायाची व्याप्ती पाहता न्यायालयाकडून ललितची पोलिस कोठडी वाढवून मागणार असल्याचीही शक्यता आहे.