ललित पाटीलचा मुक्काम नाशिक पोलिस कोठडीत; तीन साथीदारांचीही सोबतच रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 08:23 AM2023-12-10T08:23:44+5:302023-12-10T08:24:08+5:30
शुक्रवारी मुंबईत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ललितसह रोहित चौधरी, जिशान शेख, हरिशपंत या तिघांचा ताबा नाशिकच्या अमली पदार्थविरोधी पथकाने घेतला.
नाशिक : पुण्याच्या ससून रुग्णालयातून देशभरात एमडी ड्रग्जचे रॅकेट चालविणारा व या रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्जमाफिया ललित पाटीलसह तिघा संशयितांना शनिवारी येथील सत्र न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
शुक्रवारी मुंबईत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ललितसह रोहित चौधरी, जिशान शेख, हरिशपंत या तिघांचा ताबा नाशिकच्या अमली पदार्थविरोधी पथकाने घेतला. त्यांना चोख बंदोबस्तात रात्री उशिरापर्यंत नाशिकला आणण्यात आले. शनिवारी या चौघांसह शिवाजी शिंदे यालाही न्यायालयात हजर केले. त्याची वाढीव पोलिस कोठडी आज संपणार होती. नाशिकातूनही ड्रग्जचे उत्पादन घेतले जात होते. त्याची कसून चौकशी करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी पोलिसांनी केली. न्यायालयाने शिंदे यास न्यायालयीन कोठडी मंजूर केली, मात्र ललित, रोहित, जिशान आणि हरिशपंत या चौघांना १८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
सगळे नाशिक पोलिसांच्या ताब्यात
ड्रग्जप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी ड्रग्जमाफिया संशयित ललित पाटील त्याचा भाऊ मास्टरमाइंड भूषण पाटील याचा ‘खजिनदार’ अभिषेक बलकवडे, रोहित चौधरी, जिशान शेख, हरिशपंत हे सगळे आता नाशिक पोलिसांच्या ताब्यात आहेत.
त्यांची एकत्र चौकशी पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाकडून केली जात आहे.