‘सेटलमेंट’ करणारा ललित पुढे बनला ड्रग्ज माफिया! गुन्हेगारांना राहिला होता जामीन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 06:18 AM2023-12-15T06:18:52+5:302023-12-15T06:20:00+5:30
रिसर्च सायंटिस्ट अरविंदकुमार लोहारे व हरीशपंत यांना पहिला दणका २०१८ ला नाशिक पोलिसांनी दिला होता.
नाशिक : पुण्याच्या ससून ड्रग्ज प्रकरणातून राज्यभरात चर्चेत आलेला संशयित ड्रग्ज माफिया ललित पाटील हा नाशिकमध्ये सोने घालून मिरविणारा ‘नेता’ म्हणून ओळखला जात होता. मुंबईतील गुन्हेगारांना नाशिकमध्ये मदत करून सेटलमेंट करत ललित हा पुढे एमडीचा ड्रग्ज माफिया बनला. एमडीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या मुंबईच्या फारुख बटाटाचा मुलगा सैफुल्लाला जामीनदार ललित राहिला होता. रिसर्च सायंटिस्ट अरविंदकुमार लोहारे व हरीशपंत यांना पहिला दणका २०१८ ला नाशिक पोलिसांनी दिला होता.
गुन्हेगारांना कधी स्वत: जामीन राहत, तर कधी जामीन शोधून देण्यासाठी ललित मदत करत होता. २०१८ मध्ये नाशिक गुन्हे शाखा युनिट-१चे तत्कालीन पोलिस निरीक्षक सध्याचे सहायक आयुक्त आनंदा वाघ यांच्या पथकाने एका कारमधून २६५ ग्रॅम एमडी जप्त करत संशयित रणजित मोरे, पंकज धोंडे, नितीन माळोदे यांना अटक केली होती. या गुन्ह्याशी संबंधित मुंबईतील संशयित नदीम सलिम सौरठीया व सैफुल्ला फारुख शेख या दोघांना नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. याच सैफुल्लाला ललित जामीन राहिला होता.
...असा आला संपर्कात
नाशिकमधून जामिनावर सुटल्यानंतर अरविंदकुमार, हरीशपंत यांनी महाडला एमडी निर्मिती सुरू केली होती. तो कारखाना पुणे पोलिसांनी उद्ध्वस्त केला. त्यावेळी अरविंदकुमारने ललितकडे रोकड ठेवल्याची माहिती दिली. त्यानंतर पुणे पोलिसांनी ललितला बेड्या ठोकल्या. अरविंदकुमारकडून ललितने एमडीचा ‘फॉर्म्युला’ माहिती करून घेत चोरी छुप्या पद्धतीने नाशिकच्या शिंदे गावात कारखाना सुरू केला होता.
लोहारे, हरीशपंतला पहिला दणका
सैफुल्लाच्या चौकशीतून पुढे संशयित अरविंदकुमार व हरीशपंत या दोघांची नावे उघड झाली होती.
अरविंद हा तेव्हा फरार झाला होता. उत्तर प्रदेशातील मुज्जफरनगरमधून त्याच्या मुसक्या बांधल्या होत्या.
त्याच्या चौकशीतून पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे त्याचा साथीदार हरीशपंत हा एका फ्लॅटमध्ये एमडी तयार करत असल्याची माहिती मिळाली होती. दुसऱ्या पथकाने तो कारखाना उद्ध्वस्त केला होता.
ललितसह हरीशपंत हे दोघे सध्या नाशिक अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कोठडीत आहेत.