लमाण समाजाचे ‘हातोडा’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 01:20 AM2019-01-08T01:20:36+5:302019-01-08T01:20:59+5:30
पारंपरिक खडी फोडण्याचा व्यवसाय करणाऱ्या लमाण समाजावर उपासमारीची वेळ आल्याने या समाजाची शासन दरबारी नोंद व्हावी, यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी छावा लभान क्रांतिवीर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हातात ‘हातोडा’ घेऊन निदर्शने केली.
नाशिक : पारंपरिक खडी फोडण्याचा व्यवसाय करणाऱ्या लमाण समाजावर उपासमारीची वेळ आल्याने या समाजाची शासन दरबारी नोंद व्हावी, यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी छावा लभान क्रांतिवीर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हातात ‘हातोडा’ घेऊन निदर्शने केली. दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र जमून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, लमाण समाज रोजगारासाठी कायम भटकंती करीत असल्यामुळे त्याला शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नाही. उलट तंत्रज्ञानामुळे त्यांच्या रोजगारावर गदा आली असून, सरकारने हातफोड खडी बंद केल्यामुळे रस्त्यासाठी लागणारी हातफोड खडीचे काम बंद झाले त्याऐवजी क्रशरची खडी वापरली जात आहे. त्यामुळे या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.
या आंदोलनात मुकेश माळी, सुभाष जाधव, नथाराम नवले आदी सहभागी झाले होते. या समाजाची शासन दरबारी नोंद होऊन पारंपरिक व्यवसाय हातफोड खडी व्यवसायाची नोंद व्हावी, लमाण समाजाच्या लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा जेणे करून त्यांचे कुटुंब स्थिर होऊन मुलांना शिक्षण मिळेल. लमाण समाजाच्या भूमिहीन कुटुंबीयांना पाच एकर जमीन कसण्यासाठी मिळावी, लमाण समाजाला एस. टी. प्रवर्गात समाविष्ट करावे, जातीच्या दाखल्यासाठी लागणारा १९६१ चा पुरावा रद्द करावा आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत.