२० मिनिटांत तीन सोनसाखळ्या लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 01:43 AM2019-08-29T01:43:50+5:302019-08-29T01:44:07+5:30
मागील दोन दिवसांत शहरात सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत महिलांच्या सोनसाखळी ओरबाडण्याच्या घटना सातत्याने घडल्याने संताप व्यक्त होत आहे. बुधवारी (दि.२८) चोरट्यांनी तर दिवस उगवताच अवघ्या वीस मिनिटांत तीन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पळ काढत पोलिसांना आव्हान दिले.
नाशिक : मागील दोन दिवसांत शहरात सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत महिलांच्या सोनसाखळी ओरबाडण्याच्या घटना सातत्याने घडल्याने संताप व्यक्त होत आहे. बुधवारी (दि.२८) चोरट्यांनी तर दिवस उगवताच अवघ्या वीस मिनिटांत तीन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पळ काढत पोलिसांना आव्हान दिले. विशेष म्हणजे यामध्ये एका घटनेत चोरट्यांनी हेल्मेट परिधान केल्याचेही बोलले जात आहे. हेल्मेटमुळे चोर कोण अन् साव कोण हे ओळखणे आता पोलिसांनाच जिकि रीचे ठरू लागले आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
रस्ते अपघातात मृत्युमुखी पडू नये, म्हणून शहर पोलीस आयुक्तालयाने हेल्मेट सक्तीची विशेष मोहीम राबविण्यास पुन्हा सुरुवात केली आहे. एकीकडे हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांकडून दंड वसूल केला जात आहे. सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने मोहीम सकारात्मक आहे, मात्र दुसरीकडे पोलिसांना आता हेल्मेटमुळे सोनसाखळी चोरांचे वर्णन मिळविणे कठीण होऊ लागले आहे. दुचाकीवरून दोघे अज्ञात इसम हेल्मेट घालून वृद्ध महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोलिसांच्या नाकाबंदीमधूनही सहज निसटत आहेत. हेल्मेटमुळे तक्रारदार महिलांना पोलिसांना अचूक वर्णन सांगणे कठीण होत आहे. त्याचा अप्रत्यक्षपणे थेट फायदा सोनसाखळी चोरट्यांना होऊ लागला आहे. मंदीच्या काळात सोन्याचे भाव वाढल्यामुळेच सोनसाखळी चोर पुन्हा सक्रीय झाले असावे, चक्क असा कयास एका पोलीस ठाण्याच्या प्रमुखाने लगावला हे विशेष!
बुधवारी सकाळी सात वाजेपासून साडेसात वाजेपर्यंत शहरातील पंचवटी, भद्रकाली, सरकारवाडा या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत लागोपाठ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी वयोवृद्ध महिलांना ‘लक्ष्य’ केले तर एका घटने ५५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केला. दोन दिवसांत शहरातील सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरट्यांनी सोनसाखळ्या लांबविल्या आहेत. अद्याप पोलिसांच्या हाती एकाही घटनेतील संशयित हाती लागलेला नाही. याप्रकरणी काही सीसीटीव्ही फुटेज हाती लागले असून शहर गुन्हे शाखेकडून संशयित चोरट्यांचा त्याअधारे शोध घेतला जात असल्याचे गुन्हे शाखेचे उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते युवती
पोलिसांना प्राप्त झालेल्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये हेल्मेटधारक दुचाकीस्वारामागे काळे मास्क घालून एक युवती बसल्याचे आढळून आले आहे. महिलांच्या तक्रारीनुसार पाठीमागील व्यक्तीने सोनसाखळी ओढल्या. दुचाकीवरील पाठीमागे बसलेली युवतीवर यामुळे संशय बळावला आहे, याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.
‘निर्भया’ रस्त्यावर तरी महिला भयभीत
एकीकडे शहर पोलीस आयुक्तालयाने महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथक कार्यान्वित केले आहे. मागील काही महिन्यांपासून या पथकातील साध्या वेशातील महिला पोलीस शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये नियमितपणे धडे देत आहेत. तसेच निर्जन व पर्यटनस्थळी भेटी देऊन निर्भयाकडून प्रेमीयुगुलांचे समुपदेशन केले जात आहेत, मात्र शहरातील विविध भागांमध्ये सर्रासपणे रात्रं-दिवस महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून चोरटे फरार होत असल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
४महिलांना घराबाहेर निघणे कठीण होत आहे. रात्री शतपावली करणे असो किंवा सकाळचा फेरफटका मारणे महिलांना महागात पडू लागला आहे. सोमवारपासून सलग घटना घडल्याने ‘निभर्या’ नेमके कुठे? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
अशा घडल्या बुधवारी घटना
पंचवटी : मीनाताई ठाकरे स्टेडियमकडे जाणाºया रस्त्यावर सुरेखा राजेंद्र उपासनी (६२) यांच्या गळ्यातील १२ ग्रॅमची २० हजार रुपये किमतीची सोनसाखळी बुधवारी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावली.
भद्रकाली : काठे गल्लीतील नावीन्यनगर भागातून पायी जात असलेल्या शालिनी रघुनाथ सोनांबेकर (७०) या आजींच्या गळ्यातील २ तोळ्याची ३० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हेल्मेटधारक दुचाकीस्वारांनी सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास ओरबाडली.
सरकारवाडा : प्रमोद महाजन उद्यानाकडून अशोकस्तंभाकडे जाणाºया मीनाक्षी शिवाजी आव्हाड (५५) यांची ५० हजार रुपये किमतीची सोनसाखळी साडेसात वाजेच्या सुमारास हिसकावली.