पावणे अठरा लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:12 AM2021-01-02T04:12:44+5:302021-01-02T04:12:44+5:30
मालेगाव : शहरातील बारा बंगला भागातील भरवस्तीत एसबीआय कॉर्नर, मोक्ष प्लाझा येथील फ्लॅट नं. ४ मध्ये धाडसी घरफोडी झाली ...
मालेगाव : शहरातील बारा बंगला भागातील भरवस्तीत एसबीआय कॉर्नर, मोक्ष प्लाझा येथील फ्लॅट नं. ४ मध्ये धाडसी घरफोडी झाली असून, अज्ञात चोरट्याने सुमारे १७ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी छावणी पोलिसात मेघ प्रदीप शहा (४५) रा. १०, निवास एजन्सी, बीएसएनएल ऑफिससमोर, शरणपूर, कॅनडा कॉर्नर, नाशिक यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला. २७ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा ते ३१ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेदरम्यान ही चोरी झाली. चोरट्यांनी फिर्यादीच्या राहत्या घराचा मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. हॉल व बेडरूममधील लाकडी कपाटाचे लॉकर तोडून कपाटात ठेवलेले २ लाख रुपये किमतीचे ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी मंगळसूत्र, ८० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन अंदाजे २० ग्रॅम, ३२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातले वजन अंदाजे ५ ग्रॅम वजनाचे ८ सेट, २ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या, ८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे पँडल, २ लाख रुपये किमतीचे देवीचे चिन्ह असलेले प्रत्येकी ५ ग्रॅॅम वजनाचे १० नग सोन्याचे शिक्के, ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे झुमके, ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे वेढे, ८ लाख रुपये किमतीचे सोन्याचे तुकडे ५० ग्रॅम वजनाचे ४ नग, ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट, ५ हजारांची मोत्याची नथ, ३ हजार रुपये किमतीचा चांदीचा कुंकवाचा करंडा, ३ हजार रुपये किमतीचे चांदीचे दिवे ५ नग, १,५०० रुपये किमतीची चांदीची वाटी ५ नग, ६ हजार रुपये किमतीची चांदीची लोटी, ६ हजार रुपये किमतीचे चांदीचे ग्लास २ नग, ७ हजार ५०० रुपयांची चांदी, १० हजार रुपये किमतीचे सोनी कंपनीचे सीडी प्लेअर, २ हजार किमतीचा टीपी लिंक कंपनीचा राउटर, ५ हजार रुपये किमतीची गॉबलर कंपनीचा डीव्हीआर, ८ हजार रुपये किमतीचा ओझोन कंपनीचा लॉकर, ५०० रुपये किमतीचे पिलो कव्हर व बेडशीट असा १७ लाख ७७ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. फिर्यादी मेघ शहा हे नाशिक येथे राहत असल्याने, आठवड्यातून एक-दोन वेळा घरी मालेगावी येत असतात. बिल्डिंगमधील लोकांनी घरफोडी झाल्याबाबत त्यांना फोन केल्याने त्यांनी मालेगावी येऊन पोलिसात फिर्याद दिली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.