निकवेल, दहिंदुले परिसरात चंदन वृक्ष केला लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 09:09 PM2021-09-26T21:09:53+5:302021-09-26T21:10:33+5:30
कंधाणे : बागलाण तालुक्यातील निकवेल, दहिंदुले शिवारात चंदन चोरांचा सुळसुळाट निर्माण झाला असून, या चंदन चोरांनी शनिवारी (दि. २६) ...
कंधाणे : बागलाण तालुक्यातील निकवेल, दहिंदुले शिवारात चंदन चोरांचा सुळसुळाट निर्माण झाला असून, या चंदन चोरांनी शनिवारी (दि. २६) मध्यरात्री निकवेल येथील गट नंबर २१ ब अनिल वाघ यांच्या शेतातील चंदनाचे झाड कापून नेले.
दरम्यान चार-पाच दिवसांपूर्वी दहिंदुले येथील हिरुबाई बहिरम व प्रमिला रमेश ठुमसे यांच्या शेतातून चंदनाचे झाड कापून नेले. यावेळी वन कमिटीचे अध्यक्ष विवेक सोनवणे यांनी वन विभागाचे वनरक्षक नवनाथ मोरे यांना कळविले. मोरे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.
नेहमीच निकवेल डांगसौंदाणे रस्ता अत्यंत वर्दळीचा असूनही रात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन शनिवारी आसपासची चंदनाची झाडे तोडून नेली. त्यामुळे शेतकरी बांधावरील चंदनाची झाडे कापून नेली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे.
वन विभागाने चंदन चोरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी सोनवणे, पोलीस पाटील विशाल वाघ, निकवेल येथील शेतकरी अनिल वाघ व परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सध्या परिसरात चंदन वृक्षावर तस्कर हात साफ करीत असून, अत्यंत वनौषधी असलेली ही झाडे तस्करांच्या नजरेस पडली असल्याने रात्रीचा फायदा घेत या झाडांची कत्तल केली जात आहे. तालुक्याला पोलीस निरीक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी नवीनच रूजू झाले असून, आपल्या आरोपी शोधाचे कसब वापरून या चंदन तस्करांच्या मुसक्या आवळतील का? का फक्त तपासाचे सोपस्कार पूर्ण करतात, याकडे या भागातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.