ग्रामस्थांना अंधारात ठेवून रस्त्यासाठी भूसंपादन
By admin | Published: November 26, 2015 11:22 PM2015-11-26T23:22:01+5:302015-11-26T23:22:37+5:30
शिंदे : नाशिक - सिन्नर रुंदीकरणाचा तिढा बांधकाममंत्र्यांच्या पुढ्यात
नाशिक : नाशिक ते पुणे दरम्यान रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या शिंदेगावातील जमीन देण्यास ग्रामस्थांचा विरोध असताना प्रत्यक्षात भूसंपादन सुरू झाल्याची माहिती बांधकाममंत्र्यांसमोरच अधिकाऱ्यांनी दिली आणि ग्रामस्थ अवाक् झाले. कोणतीही नोटीस मिळाली नाही की पत्र नाही. मग भूसंपादन सुरू कसे झाले, असा प्रश्न या ग्रामस्थांनी उपस्थित केला. अखेरीस जिल्हाधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेऊन अहवाल सादर करावा, असा असे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. त्यानुसार शुक्रवारी सकाळी बैठक होणार आहे.
नाशिक-पुणे मार्गाचे रुंदीकरण नाशिक ते सिन्नर या महत्त्वाच्या टप्प्यात रखडले आहे. शिंदे आणि सिन्नर मार्गावरील काही शेतकरी तसेच रहिवाशांचा त्यास विरोध आहे. यासंदर्भात आमदार देवयानी फरांदे यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार केल्यानंतर पाटील यांनी गुरुवारी मुंबईत बैठक आयोजित केली होती. त्यानुसार ही बैठक झाली. शिंदेगाव येथे रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या क्षेत्रात अनेक घरे जात असल्याने ग्रामस्थांचा विरोध आहे. दरम्यान, याच मार्गावर असलेल्या माळेगाव भागातील सहा विहिरी रुंदीकरणात बाधित होत असून, त्यापैकी तीन विहिरींना भूसंपादनातून वगळण्याचा निर्णय झाल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी दिली. या विहिरी सिन्नर तालुक्यात विविध गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी उपयुक्तठरल्या आहेत. अन्य विहिरी वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य संजय तुंगार, डॉ. विलास बोराडे, विठ्ठल सांगळे, प्रमोद सोंजे तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.