‘आयटी’मध्ये भूखंड घोटाळा !
By admin | Published: March 12, 2016 11:28 PM2016-03-12T23:28:04+5:302016-03-12T23:29:24+5:30
बेकायदेशीर बांधकामे : उद्योग नियमित करण्यासाठी प्रस्ताव
नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीत विकासक आणि अन्य उद्योगांसाठी भूखंड वाटल्यानंतर आता अनधिकृत वापर नियमित करून घेण्याचे घोटाळे सुरू आहेत. एका भूखंडाचा अभियांत्रिकी उद्योगाच्या वापरासाठी भूखंड हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. अनेक भूखंडांवर तर तात्पुरते शेड उभारण्यात आले असून, अशा भूखंडांवर उद्योग उभारणी झाल्याचे दाखवून संबंधितांवर मेहेरनजर दाखविल्याचे दिसत आहे.
अंबड औद्योगिक वसाहतीत आयटी पार्कच्या परिसरातील अनेक भूखंड आयटीच्याच भूखंडांसाठी राखीव असताना प्रत्यक्षात मात्र, येथे अन्य उद्योजकांनी जागा घेतल्या आहेत. काही भूखंडांवर आयटी उद्योगाऐवजी अन्य उद्योग सुरू आहेत. अशाच प्रकारच्या एका भूखंडास अन्य ठिकाणी वापरात बदल असलेले भूखंड अन्य वापरासाठी दर्शवून नियमित करण्याचे कारस्थान सुरू आहे. एका उद्योजकाने आयटी उद्योगाच्या जागेवर इंजिनिअरिंगचा उद्योग सुरू केला, त्यावेळी औद्योगिक वसाहतीचे अधिकारी काय करीत होते असा प्रश्न आहे. कोणताही उद्योग सुरू करताना तो तीन वर्षांत बांधकाम करून सुरू करणे ही प्रमुख अट असते. परंतु तिचा भंग होत असताना आणि आयटीच्या ऐवजी भलताच कारखाना सुरू होत असताना अधिकाऱ्यांनी सोयीस्कर डोळेझाक का केली याची चौकशी करण्याची गरज आहे; मात्र ते सोडून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असे भूखंड नियमित करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविले आहे. अशाच प्रकारे अंबड येथील औद्योगिक वापराचा भूखंड हा वाणिज्य आणि वाणिज्यचा औद्योगिक करण्यासाठी एकूण चार प्रस्ताव गेल्यावर्षी पाठविण्यात आले आहेत. ज्याचा भूखंड त्या कारणासाठी वापर करणे हे नियोजन प्राधिकरणाचे नियोजन असताना, त्यात पुन्हा बदल कण्यामागे कारण काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. इतकेच नव्हे तर आता अॅमेनिटी प्लॉट श्रीखंड करण्याचे प्रकार सुरू आहे. (प्रतिनिधी)