मालगाडीत मृतावस्थेत आढळली लांडोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:10 AM2021-07-19T04:10:56+5:302021-07-19T04:10:56+5:30
नाशिक रोड रेल्वे स्थानकात मालगाडी (एनकेबीसीएनएचएल) आल्यानंतर, मालगाडीवरील कर्मचाऱ्यांनी लांडोरचा मृत्यू झाल्याची बाब रेल्वे पोलिसांना (आरपीएफ) सांगितली. दरम्यान, बोगीमध्ये ...
नाशिक रोड रेल्वे स्थानकात मालगाडी (एनकेबीसीएनएचएल) आल्यानंतर, मालगाडीवरील कर्मचाऱ्यांनी लांडोरचा मृत्यू झाल्याची बाब रेल्वे पोलिसांना (आरपीएफ) सांगितली. दरम्यान, बोगीमध्ये दरवाजाजवळ पडलेला लांडोरचा मृतदेह पोलिसांनी उचलून येथील कार्यालयात हलविला. उडण्याच्या प्रयत्नात असताना, मालगाडीच्या धक्क्याने पूर्ण वाढ झालेली लांडोर मृत्युमुखी पडल्याचा अंदाज वनविभाग व आरपीएफकडून प्रथमदर्शनी व्यक्त करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती नाशिक पश्चिम वनविभागाला कळविण्यात आली. वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक उत्तम पाटील, वन्यजीव रेस्क्यू वाहन चालक प्रवीण राठोड यांनी रेल्वे स्थानक गाठले. पाटील यांनी रेल्वे पोलिसांकडून याबाबतची सविस्तर माहिती लेखी स्वरूपात घेत, लांडोरीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला. मालगाडी ओढा ते नाशिक रोडच्या दरम्यान आली असताना ही दुर्घटना घडली असावी, कारण ओढा परिसरात मोरांची संख्या अधिक आहे, तसेच मृतदेहावरूनही खूप काही तासांपूर्वी दुर्घटना घडल्याचे जाणवत नव्हते, असे पाटील म्हणाले.
पशुवैद्यकांनी उत्तरीय तपासणी केल्यानंतर लांडोरच्या मृतदेहाचा दफनविधी गंगापूरच्या शासकीय राेपवाटिकेच्या आवारात करण्यात आला. याबाबतची नोंद वनविभागाकडून करण्यात आली आहे.
---
180721\18nsk_11_18072021_13.jpg~180721\18nsk_12_18072021_13.jpg
रेल्वेत आढळला मोराचा मृतदेह ( छायाचित्र: प्रशांत खरोटे)~रेल्वेत आढळला मोराचा मृतदेह ( छायाचित्र: प्रशांत खरोटे)