लंकेश हत्या; पुरोगामी संघटनांतर्फे मूक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 12:29 AM2017-09-08T00:29:14+5:302017-09-08T00:29:21+5:30
‘प्रतिगाम्यांचा धिक्कार असो’, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या मारेकºयांना तत्काळ अटक करावी, या आशयाचे फलक प्रदर्शित करत शहरातील पुरोगामी संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि. ७) सावरकरनगर येथून गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
नाशिक : ‘प्रतिगाम्यांचा धिक्कार असो’, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या मारेकºयांना तत्काळ अटक करावी, या आशयाचे फलक प्रदर्शित करत शहरातील पुरोगामी संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि. ७) सावरकरनगर येथून गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सावरकरनगर येथून सुरू झालेला हा मोर्चा जेहान सर्कल, प्रसाद मंगल कार्यालय सर्कल, विद्या विकास सर्कल, कुसुमाग्रज स्मारक या मार्गावर काढण्यात आला होता. कुसुमाग्रज स्मारक येथे या मोर्चाच्या समारोपप्रसंगी बोलताना ज्येष्ठ विचारवंत प्रा. गणेश देवी यांनी गौरी लंकेश यांच्या हत्येची एसआयटीमार्फत तत्काळ चौकशी व्हावी, देशात सातत्याने होत चाललेल्या हत्या ही अतिशय निंदनीय बाब असून, संपूर्ण देशावर याची गडद छाया पसरत चालली असून, नागरिकांचे व्यक्तीस्वातंत्र्य धोक्यात येऊ लागल्याचे यावेळी सांगितले.
गौरी लंकेश यांच्यासह डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या झालेल्या हत्यांचा निषेध जेवढ्या कडक शब्दात करू तेवढा कमी असल्याचे सांगताना आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा हल्ला ठरवून केला असल्याचेही देवी यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात अशा प्रकारचे खटले अतिशय कमकुवतपणे सुरू असल्याकडेही देवी यांनी यावेळी लक्ष वेधले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी पुरोगामी विचारांची परंपरा संपलेली नसून, व्यवस्थेला जाब विचारण्यासाठी असे पुरोगामी नेते पुढे येतच राहतील, असे सांगितले. मोर्चाच्या समारोपप्रसंगी अपरांती अकादमीचे संजय अपरांती, डॉ. डी. एल. कराड आदिंनी आपल्या मनोगतातून लंकेश यांच्या हत्येचा निषेध केला. मूक मोर्चाच्या समारोपप्रसंगी श्रीधर देशपांडे, अनिता पगारे, श्यामला चव्हाण, तानाजी जायभावे, मुकुंद दीक्षित, महेंद्र दातरंगे, वसंत एकबोटे, मिलिंद वाघ, संदेश भंडारे, वासंती दीक्षित यांच्यासह पुरोगामी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.