परप्रांतातील टमाट्याची मोठी आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 04:03 PM2019-11-16T16:03:25+5:302019-11-16T16:03:53+5:30
स्थानिक मालाचे दर घसरले : उत्पादकांमध्ये चलबिचल
वणी : मध्यप्रदेश व गुजरात राज्यातील टमाटा आवक सुरु झाल्यामुळे स्थानिक उपबाजारात टमाटा दर घसरले आहेत. प्रारंभी टमाटा दरात तेजीचे वातावरण होते मात्र सध्या स्थिती बदलल्याचा परिणाम दरावर झाला असल्याचे सांगितले जाते.
गेल्या दोन दिवसांपासून टमाट्याच्या दरात घसरण होत असल्याने उत्पादकांमध्ये चलबिचल वाढली आहे. दक्षिण भागातील कोल्हार, चिंतामणी, चिकमंगलुर या ठिकाणी टमाटा उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरु झाले आहे. या ठिकाणचा टमाटा तुलनात्मक स्वस्तही आहे. २० किलो टमाटा सध्या १२५ रुपये असे घाऊक बाजाराचे दर शुक्र वारी(दि.१५) राहिल्याची माहीती व्यापारी संजय उंबरे यांनी दिली. तसेच याठिकाणचा टमाटा दुबई व अखाती देशातही निर्यात होत असुन आकारमान व ताजेपणा हे टमाट्याचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे काही परप्रांतीय व्यापाऱ्यांनी दक्षिण भागाची वाट धरली आहे. तसेच विशाखापट्टणम, चेन्नई या ठिकाणी प्रति २० किलो 150 रु पये टमाट्याचे दर असल्याने तेथेही खरेदी विक्र ीची उलाढाल वाढली आहे. मध्यप्रदेश या ठिकाणच्या टमाट्यानेही बाजारात प्रवेश केला असुन गुजरात राज्यातील कपडवंज या ठिकाणचा टमाट्याने गुजरातच्या बाजारसमित्या काबिज केल्या आहेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम टमाट्याच्या दरावर झाल्याने स्थानिक ठिकाणच्या दरावर याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रारंभी मिळणारे टमाट्याचे दर तुलनेने कमी झाले आहेत.